सातारा : शाहूपुरीतील हुतात्मा उद्यानातील सिंथेटिक ट्रॅक व पेव्हर ब्लॉकच्या ट्रॅकची झालेली दुरवस्था. (Pudhari File Photo)
सातारा

Hutatma Udyan Walking Track Issue | हुतात्मा उद्यानात नागरिकांचा ‘वॉक’ ठरतोय धोकादायक!

Slippery Synthetic Track | सिंथेटिक ट्रॅक खराब : शेवाळलेल्या ट्रॅकमुळे घसरतोय पाय; पालिकेचे दुर्लक्ष

पुढारी वृत्तसेवा

सातारा : लाखो रुपये खर्च करून नागरिकांच्या आरोग्यासाठी आणि विरंगुळ्यासाठी उभारलेले शाहूपुरीतील हुतात्मा उद्यान सध्या प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे समस्यांच्या विळख्यात सापडले आहे. उद्यानातील वॉकिंग ट्रॅकची झालेली दुरवस्था नागरिकांसाठी, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठी डोकेदुखी ठरली असून, सकाळ-संध्याकाळचा फेरफटका आता आरोग्याऐवजी अपघातांना निमंत्रण देत आहे.

हुतात्मा उद्यानात सिंथेटिक आणि पेव्हर ब्लॉक वापरून तयार करण्यात आलेल्या वॉकिंग ट्रॅकची स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. पावसाचे पाणी साचून आणि नियमित स्वच्छतेअभावी संपूर्ण ट्रॅकवर शेवाळाचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे ट्रॅक निसरडा झाला असून, चालण्यासाठी आलेल्या अनेक ज्येष्ठ नागरिकांचा तोल जाऊन ते पडल्याच्या घटना वाढल्या आहेत. किरकोळ दुखापतींपासून ते गंभीर अपघातांपर्यंतचा धोका निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे आणि संतापाचे वातावरण आहे. ट्रॅकच्या समस्येसोबतच उद्यानात इतरही अनेक गैरसोयींनी तोंड वर काढले आहे. अस्वच्छता: उद्यानात जागोजागी कचर्‍याचे ढीग साचले आहेत.

उद्यानाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात गवत आणि अनावश्यक झुडपे वाढल्याने ते भकास दिसत आहे. पूर्वी उद्यानाच्या स्वच्छतेसाठी चार कर्मचारी कार्यरत होते. आता केवळ एकच कर्मचारी गेट उघडण्या-बंद करण्याचे काम पाहतो, त्यामुळे देखभालीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एकेकाळी नागरिकांच्या पसंतीचे ठिकाण असलेले हे उद्यान आज स्वतःच्या अस्तित्वासाठी झगडत आहे. पालिकेने याकडे तातडीने लक्ष देऊन उद्यानाची आणि विशेषतः वॉकिंग ट्रॅकची दुरुस्ती करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांमधून होत आहे.

ओपन जिमचे साहित्य पडून

हुतात्मा उद्यानात असलेल्या सभागृहात गेल्या एक वर्षापूर्वी ओपन जिमचे साहित्य येऊन पडले आहे. मात्र, हे साहित्य अजूनही उद्यानात बसवले गेलेले नाही. त्यामुळे उद्यानात कधी ओपन जिम होणार असा प्रश्न उद्यानात फिरावयास येणार्‍या ज्येष्ठ नागरिकांसह युवक वर्गाला पडला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT