विरमाडे : पुणे- बंगळूर महामार्गावर पडलेले खड्डे मुजवण्याचे सुरू असलेले काम. Pudhari Photo
सातारा

हुश्श... महामार्गावरील खड्डे मुजले

पुढारी वृत्तसेवा

सातारा : पुढारी वृत्तसेवा

दै. ‘पुढारी’ने महामार्ग प्राधिकरणाचे काढलेले वाभाडे आणि पावसाने घेतलेली विश्रांती यामुळे अखेर पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाच्या दुरूस्तीला प्रारंभ झाला. गेल्या आठवड्यापासून पावसाने उघडीप दिल्याने महामार्गावरील बहुतांश खड्डे मुजवण्यात आले आहे. जिओ पॉलिमर या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हे खड्डे मुजवण्यात आले आहे. त्यामुळे हुश्श... बरे झाले... एकदाचे खड्डे मुजवले, असा सुस्कारा वाहनधारकांनी सोडला आहे.

महामार्गावर शिंदेवाडी ते शेंद्रे या अंतरात जागोजागी खड्डे पडलेले होते. या खड्ड्यांमध्ये वाहने आदळून मोठे नुकसान होत होते. ऐन पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साठू लागल्याने वाहनधारकांचे हाल होत होते. महामार्गावरील गॅरेज चालकांना अतिरिक्त काम यामुळे करावे लागत होते. टायर फुटणे, अ‍ॅक्सल तुटणे, रिम आऊट होणे, पाटे तुटणे, शॉकऑब्जर तुटणे अशी वाहनांचे कामे वाढलेली होती. या महामार्गाचा वापर वाढल्याने केंद्र सरकारने या महामार्गाचे रुंदीकरण केले आहे. मात्र, देखभालीअभावी महामार्गावर मोठे खड्डे पडले होते. ऐन पावसाळ्यात तर खड्ड्यांची संख्या आणखीच वाढली. खड्डे मुजवण्यासाठी शासनाने डेड लाईन ठरवून दिली होती. त्यावर पालकमंत्री शंभूराज देसाई आणि जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दुरुस्तीची डेडलाईन ठरवत महामार्ग ठेकेदारांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला होता.

महामार्गाच्या दुरवस्थेबाबत दै. ‘पुढारी’नेही परखड वृत्त प्रसिध्द करत वाहनधारकांच्या समस्या मांडल्या. याची दखल घेऊन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने महामार्गावरील खड्डे मुजवण्याची मोहिम हाती घेतली आहे. या कामासाठी जिओ पॉलिमर काँक्रिटचा वापर केला जात असल्याने दीर्घकाळासाठी खड्ड्यांची दुरुस्ती होताना दिसत आहे. यासोबतच पाऊस थांबल्याने कोरड्या रस्त्यावर हॉटमिक्सिंंग डांबरचा वापर करुनही खड्डे मुजवण्यात येत आहेत.दरम्यान, वेळे, सुरुर, कवठे, भुईंज, पाचवड, विरमाडे या गावांच्या हद्दीमध्ये खड्डे मुजवण्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. तर आनेवाडी टोलनाक्यापासून शेंद्रेपर्यंतच्या रस्त्याचे काम हाती घेण्यात आलेले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT