वडूज : पत्नीच्या रक्षाविसर्जन विधी दिवशीच रात्री पतीचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाल्याची दुर्दैवी घटना वडूज येथे घडली. सौ. शोभा महावीर उपाध्ये (वय 70), महावीर भुजबल्ली उपाध्ये (वय 75) असे या दाम्पत्याचे नाव आहे.
उपाध्ये कुटुंबिय येथे गेल्या 25 वर्षांपासून स्थायिक झाले. त्यांचे कर्नाटक राज्यातील शेडबाळ (ता. अथणी) हे मूळ गाव आहे. वडूज ता.खटाव येथील जैन मंदिरात ते पुजारी म्हणून काम पाहत होते. मंदिरातील पूजा, अर्चा अशा धार्मिक विधीबरोबरच त्यांचा सामाजिक कार्यक्रमातही सहभाग असायचा. सर्वांशी मनमिळावू, मितभाषी व प्रेमळ स्वभावामुळे उपाध्ये दाम्पत्य जैन समाज बांधवांत सर्वांच्या परिचयाचे होते.
सौ. उपाध्ये या गेल्या काही महिन्यांपासून आजारी होत्या. सोमवारी (दि. 5) त्यांचे निधन झाले. तर बुधवारी (दि. 7) त्यांचा रक्षाविसर्जन विधी झाला. रात्री 8 वाजता महावीर उपाध्ये यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यामध्ये त्यांचे निधन झाले. पत्नीच्या रक्षाविसर्जनादिवशीच पतीच्या निधनाची घटना घडल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. उपाध्ये दाम्पत्याच्या पश्चात तीन मुली, एक मुलगा, जावई, सून, नातवंडे असा परिवार आहे. विधानाचार्य पंडित दिनेश उपाध्ये यांचे ते आई-वडील होत.