मेढा : कौटुंबिक वादातून रागाच्या भरात पतीने पत्नीवर कोयत्याने वार केले. जवळवाडी (ता. जावली) येथे ही घटना घडली. घटनेनंतर संशयित पती अश्विन दत्तू चोरगे (वय 36) स्वत: मेढा पोलिस ठाण्यात सायंकाळी हजर झाला. सौ. अश्विनी अश्विन चोरगे (वय 30) असे जखमी पत्नीचे नाव आहे. चोरगे दाम्पत्यामध्ये सातत्याने वाद होत होते. त्यामुळे अश्विनी गेल्या काही दिवसांपासून माहेरी राहत होत्या. त्यानंतर मंगळवारी सकाळी दोघे पती-पत्नी नवी मुंबईतून गावाला आले होते.
सायंकाळी त्यांच्यात वाद होऊन पती अश्विन याने पत्नीवर कोयत्याने सात ते आठ वार केले. त्यानंतर तो मेढा पोलिस ठाण्यात हजर झाला आणि पत्नीवर कोयत्याने वार केल्याचे सांगितले. मेढा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी अश्विनी चोरगे यांच्या घराला बाहेरून कडी लावल्याचे निदर्शनास आले. पोलिस घराच्या किचनमध्ये गेल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात अश्विनी चोरगे दिसून आल्या. पोलिसांनी तत्काळ जखमी अश्विनी यांना मेढा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथून त्यांना सातारला हलवण्यात आले.
घटनेची माहिती कळताच वाईचे पोलिस उपअधीक्षक सुनील साळुंखे यांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत मेढा पोलीस स्टेशनला याबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पुढील तपास मेढ्याचे सपोनि सुधीर पाटील हे करत आहेत.