कोल्हापूर सर्किट बेंचच्या कार्यक्रमाला सातार्‍यातील वकील एकत्रित रवाना झाले. Pudhari Photo
सातारा

Kolhapur circuit bench : सातार्‍यातील शेकडो वकील कोल्हापुरात

अनुभवला सर्किट बेंचचा सोहळा : पक्षकारही आनंदले

पुढारी वृत्तसेवा

सातारा : कोल्हापूर येथे झालेला सर्किट बेंच सोहळा सातारा जिल्ह्यातील शेकडो वकिलांनी याची देही याची डोळा अनुभवला. या सोहळ्यासाठी सातार्‍यातून ट्रॅव्हल्स, कार यामधून शेकडो वकील मंडळी कोल्हापुरकडे रवाना झाली. या सोहळ्यामुळे जिल्ह्यातील पक्षकारही आनंदून गेले.

कोल्हापूर, सातारासह सहा जिल्ह्यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच आपल्या परिसरात व्हावे, यासाठी 40 वर्षाहून अधिक वर्षे लढा दिला. आंदोलने, मोर्चे, निवेदने देण्यात आली. याचा परिपाक म्हणजे रविवारी अखेर कोल्हापूर येथे सर्किट बेंचची सुरुवात करण्यात आली. रविवारी झालेल्या या कार्यक्रमासाठी सातारा जिल्ह्यातील वकील मंडळी भल्या पहाटेच कोल्हापूरला रवाना झाली. कार्यक्रमासाठी भव्यदिव्य मंडप उभारण्यात आला होता. कोल्हापुरात जणू दिवाळीचेच वातावरण निर्माण झाले होते. पावसाची रिपरिप असतानाही देखणे आणि नेटके नियोजन केल्याने सहा जिल्ह्यातून आलेल्या वकील मंडळींना त्रासाला सामोरे जावे लागले नाही. कार्यक्रमासाठी आलेल्या सर्वांमध्ये आनंदाचे वातावरण होते.

रविवारी सर्किट बेंचची सुरुवात झाली. कोल्हापुरातील हा कार्यक्रम भव्यदिव्य असा होता. सातारा तसेच जिल्ह्यातून आम्ही वकील मंडळी सुमारे दीडशेहून अधिकजण उपस्थित होतो. कार्यक्रमासाठी ट्रॅव्हल्स बुक करुन आम्ही गेलो होतो. सर्किट बेंचसाठी उपस्थित राहण्याचा सुवर्णक्षण आम्ही अनुभवला.
- अ‍ॅड. सयाजीराव घाडगे, अध्यक्ष सातारा जिल्हा बार असोसिएशन.
कोल्हापूर येथे सर्किट बेंच झाल्यामुळे आम्हालाही आनंद झाला आहे. मुंबई येथे जाताना प्रत्येकवेळी अनेक त्रासांना सामारे जावे लागत होते. अनेकदा महिला, लहान मुले, वृध्द यांना देखील मुंबईला आलेले पाहत आलो आहे. जाण्यापासून तेथे गेल्यानंतर खाण्याचे वांदे, राहण्याचे वांदे होतात. आता मात्र कोल्हापूरला सर्किट बेंच झाल्याने वेळ, पैसा व मानसिक त्रास नक्की कमी होण्यास मदत होणार आहे.
-विजय सावंत, पक्षकार.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT