सातारा : पुढारी वृत्तसेवा : सातार्यात वाहतूक समस्या निर्माण होत असल्याने अडथळा ठरणारी अतिक्रमणे काढण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सातारा मार्केट कमिटीतील उमेदवारांना अपात्र ठरवताना कुणालाही पाठीशी घालू नये. सत्तेचा ताम्रपट कुणीही घेऊन आलेले नाही. पण निष्क्रीय व नकारात्मक द़ृष्टिकोन ठेवणार्या अधिकार्यांकडून लोकांच्या अपेक्षा कशा काय पूर्ण करणार? असा सवाल खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.
जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात विविध विभागांची खा. उदयनराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी तसेच विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना खा. उदयनराजे म्हणाले, जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न गेली 12 वर्षांपासून मार्गी लागला नाही. यासंदर्भात तातडीने प्रस्ताव तयार करून पाठवण्याबाबत जिल्हाधिकार्यांना सुचना केल्या होत्या. प्रकल्पग्रस्तांना जमीन दिली पण मूळ मालक त्यांना जमीन कसून देत नाहीत अशी अवस्था कुणाचीही होवू नये. शहरातील वाहतूक समस्येसंदर्भातही बैठकीत चर्चा झाली. शाळा, महाविद्यालये परिसरातील अतिक्रमणे काढण्याचे निर्देश दिल्याचे त्यांनी सांगितले.
धरण परिसरातील अतिक्रमणांबाबत विचारले असता खा. उदयनराजे म्हणाले, धरण परिसरातील अतिक्रमणांचा प्रश्न गंभीर आहे. खाणी सुरू असताना मानवी वस्ती वाढल्यावर खाणी बंद केल्या. जो नियम आम्हाला लागू होतो त्याला कुणी अपवाद होता कामा नये. यासंदर्भात जिल्हाधिकार्यांना निर्देश दिल्याचे त्यांनी सांगितले.
शेतकरी संघटनेच्या उमेदवारांना दमदाटी केली जात आहे. सत्ताधार्यांकडून अपात्र उमेदवारांना पात्र ठरवले जात आहे का? असे विचारले असता खा. उदयनराजे म्हणाले, सत्ता कुणाचीही असो पण सत्तेमुळे असे काही होत नाही. कुणीही ताम्रपट घेऊन येत नाही, असं वक्तव्य मागच्या आठवड्यात मेढ्यात झालेल्या सभेत झालं. सत्ता आज आहे उद्या नाही. आज सत्तेत 'हे' असतील उद्या 'ते' सत्तेत असतील. जे पात्र होवू शकत नाहीत ते अपात्र होणारच ना?
जिल्हा बँकेचे उपाध्यक्षांच्या सोसायटीत 2 कोटींचा घोटाळा झाला असून हे प्रमाण वाढले आहे, असे विचारले असता खा. उदयनराजे म्हणाले, या घोटाळ्यांबाबत त्यांनाच विचारा. जिल्हा बँकेत मी संचालक आहे. ही बँक चांगल्या पद्धतीने चालली असल्याचे सांगितले जाते, मग ईडीचे पत्र का आले? याचे कारण कळू द्या. काहीतर बेस असणारच ना. अगोदर फार मोठी व्यक्ती चेअरमन होती. बँकेत सर्व काही टॉप सिक्रेट आहे का? सहकारात पळवाटा भरपूर असतात. मार्केट कमिटी, जिल्हा बँक निवडणुकीत मर्यादित मते असतात. हे लोक मर्यादित मतांमध्ये खेळतात.
माध्यमांनी आवाज उठवला पाहिजे. जिल्हा बँकेत घोटाळे झाले नाहीत का? बँकेचे सीईओंना जेवढे बँकिंगचे ज्ञान असते तेवढे संचालक किंवा बोर्डाला नसते. तज्ज्ञ असल्यामुळेच साईओपदी नेमणूक झाली पण तेच समजून घ्या असे म्हणतात. त्यांना काय समजून घ्यायचे? लेखी उत्तर देत नाहीत, अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली.
जिल्हा बँकेचे आपण संचालक असताना माहिती दिली जात नाही पण अजित पवार हे बैठक बोलावून माहिती घेतात. बँक कुणाच्या आदेशाने चालते, असे विचारले असता खा. उदयनराजे म्हणाले, सहकारात या लोकांची टोळी आहे. सातारा मार्केट कमिटीत घोटाळा झाला. मनवे यांना निलंबित करण्यात आले पण पुढे काय झाले? त्याच्या बंगल्यात कोण जावून राहिले, याचा शोध माध्यमांनी घ्यावा. यावेळी साविआचे प्रतोद अॅड. डी. जी. बनकर, जि. प. चे माजी सभापती सुनील काटकर, काका धुमाळ, प्रीतम कळसकर, रॉबर्ट मोझेस, नासीर शेख, चिन्मय कुलकर्णी आदि उपस्थित होते.