House Pudhari
सातारा

Housing prices: सर्वसामान्यांची घराची स्वप्ने महागणार?

युध्दामुळे बांधकाम खर्चातील वाढीचा परिणाम

पुढारी वृत्तसेवा

कराड : जागतिक स्तरावर सुरू असलेला युध्द संघर्ष आणि आर्थिक अस्थिरतेचा परिणाम आता रिअल इस्टेट क्षेत्रावर दिसू लागला आहे. बांधकामासाठी लागणाऱ्या लोखंड, सिमेंट, वाळू आदी कच्च्या मालाच्या दरात मोठी वाढ झाल्यामुळे घरांच्या किंमती वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे स्वतःच्या घराचे स्वप्न अधिक महाग होण्याची भीती व्यक्त होत आहे.

गेल्या काही महिन्यांत बांधकाम साहित्याच्या दरात सातत्याने वाढ होत असून, यामुळे बांधकाम व्यावसायिकांचे प्रकल्प खर्च वाढले आहेत. त्याचा थेट परिणाम घरांच्या विक्री दरावर होत आहे. कराड सारख्या वाढत्या शहरात आधीच घरांच्या किंमती वाढत आहेत. नव्या वाढीमुळे ग्राहकांवर अतिरिक्त आर्थिक ताण येणार आहे.

रिअल इस्टेट क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले, जागतिक परिस्थिती स्थिर होईपर्यंत कच्च्या मालाच्या दरात घट होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे आगामी काळात नवीन प्रकल्पांचे दर वाढण्याची शक्यता अधिक आहे. काही बांधकाम व्यावसायिकांनी प्रकल्पांची गती कमी करण्याचा निर्णय घेतला असून, ग्राहकांकडून मागणी असली तरी वाढलेल्या खर्चामुळे व्यवहारात सावधगिरी बाळगली जात आहे.

यामुळे मध्यमवर्गीय नागरिकांचे घर खरेदीचे नियोजन पुढे ढकलले जात आहे. घरांच्या वाढत्या किमतींमुळे ‌‘स्वतःचे घर‌’ हे स्वप्न अनेकांसाठी दूर जात असल्याची भावना व्यक्त होत आहे. कराड शहरातील बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या व्यावसायिकांनी याला दुजोरा दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT