रेठरे बुद्रुक : आटके टप्पा (ता. कराड) येथे महामार्गालगत असणारे हॉटेल हायवे सम्राटला शार्ट सर्किटने आग लागून हॉटेलमधील फर्निचर व अन्य साहित्य खाक झाले. ही दुर्घटना शनिवारी पहाटे तीनच्या सुमारास घडली.
हॉटेलमधील काम उरकल्याने मालक अशोक देसाई नेहमीप्रमाणे घरी गेले. तर हॉटेलमधील कामगार रात्री झोपी गेले होते. पहाटे तीनच्या सुमारास खुबी येथील जयदीप पाटील हे कराडला मोटारसायकलवरून जात असताना त्यांना हॉटेलमध्ये आग भडकल्याचे दिसले. त्यांनी या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता आतमध्ये फर्निचर तसेच पीओपी, विद्युत तारा व अन्य साहित्य जळत असलेले दिसले. त्यांनी तातडीने प्रशांत पाटील यांना फोनवरून ही माहिती दिली.
दरम्यान, मदतीला कोणीही नव्हते तरीही प्रसंगावधान राखून त्यांनी बाहेरून खडी व वाळू आगीवर टाकण्याचा प्रयत्न केला. परंतु आग आटोक्यात आली नाही. उलट लाकडी साहित्याने पेट घेतल्याने आग भडकली. पाटील यांनी हॉटेलच्या पाठीमागील बाजूस खोलीमध्ये झोपलेल्या कर्मचार्यांना मोठमोठ्याने आवाज देऊन जागे केले. सर्वांनी प्रयत्न करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. फर्निचर व इलेक्ट्रिक साहित्य आगीत जळून खाक झाले. पाच लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
मित्र कुठे उपयोगी येईल सांगता येत नाही. खुबी येथील जयदीप पाटील यांनी प्रसंगावधान ओळखून फोनवरून संबंधितांना कल्पना तर दिलीच शिवाय कर्मचार्यांना जागे करून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. अजून थोडा वेळ गेला असता तर संपूर्ण हॉटेल आगीच्या भक्ष्यस्थानी पडले असते. प्रसंगात मित्र मदतीसाठी धावून येतो, हेच जयदीप पाटील यांनी कृतीतून दाखवून दिले आहे.