सातारा

Shivendraraje Bhosale: रुग्णालयांचे फायर ऑडिट कागदावर नको

ना. शिवेंद्रराजे : प्रत्यक्ष तपासणीसह मॉक ड्रील करण्याच्या सूचना

पुढारी वृत्तसेवा

सातारा : अमरावती येथील नवजात शिशूंच्या अतिदक्षता विभागाला लागलेल्या आगीत तीन नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांच्या अग्निसुरक्षा व्यवस्थेचे काटेकोर ऑडिट आणि प्रत्यक्ष तपासणी करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिले. रुग्णालयांचे ऑडिट केवळ कागदावर न करता प्रत्यक्ष परिस्थिती तपासावी. शॉर्टसर्किटसारखी घटना घडल्यास आयसीयू, एनआयसीयू तसेच अन्य संवेदनशील विभागांतील अग्निशमन यंत्रणा कार्यरत आहेत का, अग्निशामक सिलिंडर रिचार्ज आहेत का, याची खात्री करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.

जिल्हा परिषदेत सातारा-जावली विधानसभा मतदारसंघाशी संबंधित 'एकात्मिक आरोग्यवर्धिनी समिती'ची आढावा बैठक ना. भोसले यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी त्यांनी विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी आ. मनोज घोरपडे, जि. प. अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे, उपाध्यक्ष राजूभैया भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राहुल जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे उपस्थित होते. डॉ. जाधव यांच्याकडून जिल्हा रुग्णालयासह जिल्ह्यातील अन्य रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांची माहिती घेतली .

अमरावती येथील घटनेचा संदर्भ देत ना. भोसले यांनी रुग्णालयांमधील अग्निसुरक्षेच्या उपाययोजनांबाबत प्रशासनाला स्पष्ट सूचना केल्या. रुग्णालयातील फायर एक्स्टिंग्विशर आणि अन्य अग्निशमन यंत्रणा प्रत्यक्षात सुरू आहेत का? सिलिंडर रिचार्ज केले आहेत का? याची तपासणी करा,’ असे त्यांनी सांगितले. रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी आणि संबंधित यंत्रणांना नियमित मॉक ड्रीलचे प्रशिक्षण देण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली. बैठकीस जिल्ह्यातील संबंधित अधिकारी, पदाधिकारी आणि आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष प्रशिक्षण असणे आवश्यक

आपत्कालीन परिस्थितीत घाबरून न जाता तातडीने कोणती उपाययोजना करायची, रुग्णांना सुरक्षितपणे कसे हलवायचे आणि अग्निशमन यंत्रणेचा प्रभावी वापर कसा करायचा, याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना असणे आवश्यक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच जिल्ह्यातील सर्व आरोग्य यंत्रणांनी रुग्णालयांमधील अग्निसुरक्षा व्यवस्थेची तपासणी करून त्याबाबतचा अहवाल सादर करावा, असे निर्देशही ना. भाेसलेे यांनी दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT