फलटण : पुढारी वृत्तसेवा
फलटण शहरातील एका हॉटेल व्यावसायिकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्याचे अपहरण करून मारहाण करण्यात आली. त्याच्याकडून चार लाख रुपये खंडणी उकळण्याचा प्रयत्नही झाला. याप्रकरणी एका महिलेसह सात जणांना बारा तासांच्या आत फलटण ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. हॉटेल व्यावसायिकाने फिर्याद दिली आहे.
उमेश संजय खोमणे (रा. खराडेवाडी, ता फलटण), गणेश बाळू मदने (रा. पाच सर्कल खामगाव, ता. फलटण), कुमार ऊर्फ बोक्या लक्ष्मण शिंदे (रा. भाडळी खुर्द, ता. फलटण), जयराज ऊर्फ स्वागत आनंदराव चव्हाण (रा. झिरपवाडी, ता. फलटण), आकाश काशिनाथ डांगे (रा. भाडळी बुद्रुक, ता. फलटण), माया (टोपण नाव) व अनिल गजरे (पूर्ण नाव पत्ता माहीत नाही) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
याबाबत पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, चार महिन्यांपासून तक्रारदाराच्या हॉटेलमध्ये माया असे नाव सांगणारी महिला अधूनमधून जेवणाचे पार्सल नेण्यासाठी येत होती. या महिलेचा मोबाईल क्रमांक त्यांच्याकडे होता. यातून या महिलेशी ओळख झाली. दि. 30 रोजी ही महिला हॉटेल व्यावसायिकासोबत फिरायला जाण्यासाठी तयार झाली. व्यावसायिकाने तिला सुरवडी येथून मोटरसायकलवर घेतले. लोणंद, वीर धरण या ठिकाणी फेरफटका मारल्यानंतर ते परत येत असताना त्यांना काळज बडेखानजवळ दोघांनी अडवून आमच्या बहिणीला घेऊन कुठे फिरत आहे? असे म्हणून व्यावसायिकास मारहाण केली. त्यादरम्यान ही महिला तेथून निघून गेली. दरम्यान, मारहाणीनंतर रात्री अन्य एकाने याप्रकरणी बलात्काराची केस दाखल करणार आहे, अशी व्यावसायिकाला धमकी दिली. तसेच बळजबरीने त्याच्या फोन पे द्वारे 26 हजार रुपये घेतले व उद्या आणखीन 4 लाख रुपये घेऊन येण्यास सांगितले. नाही आला तर त्याचे नग्न असलेले फोटो व बलात्कार केल्याबाबत वदवून घेतलेला व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी गोपनीय माहिती काढून संबंधीत महिलेचा शोध घेऊन तिला ताब्यात घेतले. तिच्याकडे अधिक चौकशी केली असता फलटण शहरांमधील रेकॉर्डवरील गुन्हेगार तिच्या कटात सामील असल्याचे निष्पन्न झाले. या महिलेच्या मदतीने संशयित प्रत्यक्ष हॉटेल व्यावसायीकाला लुटत होते. तर काही लोक मोबाईलद्वारे इतर संशयीतांच्या संपर्कात राहून व्यावसायीकाला हनी ट्रॅपमध्ये अडकवून पैसे उकळत होते.
पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या नेतृत्वाखाली सपोनि विशाल वायकर, शिवाजी जायपत्रे, पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने, मच्छिंद्र पाटील, पोलीस नितीन चतुरे, वैभव सूर्यवंशी, श्रीनाथ कदम, संदीप मदने, अमोल जगदाळे, श्रीकांत खरात, हनुमंत दडस, रशिदा पठाण यांनी कारवाईत सहभाग घेतला.
हनीट्रॅप प्रकरणातील संशयित सराईत असल्यामुळे पोलिसांनी अत्यंत गोपनीयरित्या माहिती काढून त्यांना अटक केली. या टोळीने फलटण, लोणंद या भागात यापूर्वी अनेकांना हनीट्रॅपमध्ये अडकवले असण्याची शक्यता आहे. अशी फसगत झालेल्या लोकांनी जवळच्या पोलीस ठाण्याशी किंवा फलटण ग्रामीण पोलिस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक सुनील महाडिक यांनी केले आहे.