सातारा

सातारा : खापरी अवशेषांमुळे उलगडणार सातार्‍याचा इतिहास

मोनिका क्षीरसागर

सातारा : विशाल गुजर
सातारा शहराला तीनशे वर्षांपूर्वीचा इतिहास असला, तरी शहर वसण्याआधी या परिसरात अनेक प्राचीन वसाहती अस्तित्वात होत्या. त्यापैकीच करंजे परिसराला प्राचीन इतिहास आहे. तामजाईनगर येथे काही दिवसांपूर्वी सापडलेल्या तांब्याच्या नाण्यांसोबत या मातीच्या ढिगार्‍यात सापडलेल्या काही प्राचीन अवशेषांमुळे सातार्‍याचा चौदाव्या शतकापर्यंतचा इतिहास उजेडात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सातारा शहराची स्थापना सुमारे तीनशे वर्षांच्या आसपास झाली आहे. त्यामुळे सातारा शहरात प्राचीन वसाहतीचा शोध अजून तरी लागलेला नाही; परंतु किल्ले साताराच्या (अजिंक्यतारा) घेर्‍यातील काही गावे ही सातारा शहरापेक्षा खूप जुनी आहेत. सातार्‍यातील करंजे हा भाग त्यापैकीच एक आहे. काही दिवसांपूर्वी आढळून आलेल्या प्राचीन अवशेषांवरून या गोष्टीला अधिक पुष्टी मिळते.

सातारा शहरानजीक असे अवशेष सापडल्याची ही पहिलीच घटना असल्याने सातारच्या इतिहासाचे एक नवे दालन खुले झाले आहे.
दरम्यान, या शोधमोहिमेत छत्रपती शिवाजी संग्रहालयाचे प्रवीण शिंदे यांच्यासह जिज्ञासाचे नीलेश पंडित, संदीप वाघुळकर, कुमार गुरव, तसेच एल. बी. एस. कॉलेजच्या प्रा. चिकमठ, प्रा. जाधव तसेच शहाजीराजे महाविद्यालयाचे प्रा. साळुंखे आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला आहे.

शोधमोहिमेत अनेकांचा सहभाग तामजाईनगर येथे नुकतीच काही इतिहासकालीन नाणी सापडली होती. ही नाणी ज्या ठिकाणी सापडली त्या ठिकाणची माती मूळची त्या ठिकाणची नसून दुसरीकडून तेथे आणून टाकल्याचे समजते. या मातीत आणखी काही नाणी असण्याची शक्यता गृहीत धरून पुरातत्त्व विभागाचे संचालक तेजस गर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी संग्रहालय, सातारा, जिज्ञासा इतिहास संशोधन व संवर्धन संस्था यांच्या माध्यमातून शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे.

अवशेषाचा कालखंड 14 व्या शतकाच्या आधीचा

करंजे येथे ज्या लोकांनी नाण्यांचा शोध घेतला त्यांनी मातीमध्ये बरीच उलथापालथ केली असल्यामुळे येथे नाणी आढळून आली नाहीत. परंतु, येथील पांढर्‍या मातीमध्ये काही प्राचीन खापराच्या भांड्यांचे अवशेष आढळून आले आहेत. अशा खापरी तुकड्यांचे बाजारमूल्य नगण्य असले, तरी या खापरी अवशेषांमध्ये खापरी भांड्यांच्या तोट्या, मडक्यांचे काठ, खापराच्या ताटांचे तुकडे, भाजक्या मातीचे मणी अशा गोष्टींचा समावेश आहे. प्रथमदर्शनी त्याचा कालखंड चौदाव्या शतकाच्या आधीचा असावा, असा अंदाज आहे.

सातार्‍यानजीक लागू शकतो एखाद्या जुन्या वसाहतीचा शोध…

करंजे येथे नुकतीच सापडलेली नाणी इतिहासकालीन असली, तरी त्याच्या बरोबरीने सापडलेले अवशेष अधिक प्राचीन आहेत. त्यामुळे हे अवशेष ज्या मातीत सापडत आहेत त्या वास्तूचा शोध घेणे व प्रामुख्याने त्या वास्तूसाठी वापरलेल्या मातीचा मूळ स्रोत याचा शोध घेणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे कदाचित सातार्‍यानजीक असणार्‍या एखाद्या जुन्या वसाहतीचा शोध लागू शकतो.

मातीच्या ढिगार्‍यात आढळली फुटकी कवडी…

ज्या काळी चलन म्हणून कवड्यांचा वापर होत असे त्या काळातील एक फुटकी कवडी या मातीच्या ढिगार्‍यात आढळून आली आहे. या फुटक्या कवडीला त्या काळात मोल होते. सोळा फुटक्या कवड्या म्हणजे एक पूर्ण कवडी अशी त्यांची तत्कालीन मोजणी होत असे. विशेष म्हणजे, ही कवडी तत्कालीन वापरात असलेल्या महाराष्ट्रीयन कवड्यांपेक्षा वेगळी आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT