High Blood Pressure 
सातारा

High Blood Pressure: चिमुकल्यांमधील उच्च रक्तदाब ठरतोय सायलेंट किलर

हृदय, मूत्रपिंडावरही दुष्परिणाम : शारीरिक निष्क्रियता, असंतुलित आहार, ताणतणावाचा परिणाम

पुढारी वृत्तसेवा
मीना शिंदे

सातारा : वाढती स्पर्धा, शारीरिक निष्क्रियता, असंतुलित आहार, ताणतणाव, झोपेची कमतरता, जास्तीचा स्क्रीन टाईम यामुळे लहान मुलांमध्ये उच्च रक्तदाबाची समस्या आढळत आहे. वैद्यकीय सर्वेक्षणानुसार १० टक्के शालेय विद्यार्थ्यांमध्ये उच्च रक्तदाब आढळतो. अनेकदा लहानग्यांमध्ये हायपरटेंन्शनची लक्षणे स्पष्ट दिसत नसल्याने हे आजारपण सायलेंट किलर ठरत आहे. उच्चरक्तदाबामुळे मुलांच्या हृदय आणि मूत्रपिंडावर दुष्परिणाम होत आहेत.

आहार-विहाराच्या चुकीच्या सवयी, वाढता स्क्रीन टाईम आदी बाबी आरोग्याच्या मुळावर बेतत आहेत. फास्टफूडच्या अतिरेकामुळे स्थूलतेसह पचनाच्या तक्रारी वाढत आहेत. प्रौढावस्थेत उद्‌भवणारा उच्च रक्तदाब चिमुकल्यांनाही ग्रासत आहे. मुलांचा चंचल स्वभाव व चंचलतेमुळे उच्च रक्तदाबाची लक्षणे स्पष्ट होत नाहीत.

मात्र, वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, फक्त लठ्ठ किंवा स्थूल असणार्‍या मुलांमध्ये उच्च रक्तदाब आढळतो असे नाही, तर सामान्य वजनाच्या सुमारे ७ टक्के मुलांमध्ये उच्च रक्तदाब आढळून येत आहे. बर्‍याचदा मुलांमध्ये हायपरटेन्शनची लक्षणे दिसत नाहीत; मात्र त्याचे गंभीर दुष्परिणाम इतर अवयव किंवा एकूण आरोग्याबाबत जाणवत असल्याने चिमुकल्यांसाठी तो सायलेंट किलर ठरतो. हळूहळू हृदय आणि मूत्रपिंडावर परिणाम करतो. उच्च रक्तदाबाच्या मुलांच्या हृदयाच्या रचनेत बदल दिसून येतो. मुलांचा स्क्रीन टाईम कमी करून मैदानी खेळांसाठी त्यांना प्रवृत्त करणे, त्यांच्याबरोबर संवाद वाढवणे व मैत्रिपूर्ण संबंध निर्माण करणे, मैदानी खेळांच्या माध्यमातून व्यायामाची गोडी वाढवणे आवश्यक आहे.

साखर, मीठ वाढवतेय धोका

पाल्याची प्रगती हा पालकांच्या प्रतिष्ठेचा विषय ठरत आहे. त्यामुळे पाल्याची कुवत न पाहता अपेक्षा ठेवल्या जात आहेत. सध्या वाढती स्पर्धा विद्यार्थ्यांमध्ये ताणतणाव वाढवत आहे. त्यातच फास्टफूडमध्ये साखर आणि मीठाचा अधिक वापर केला जात आहे. अशा फास्टफूडची चटक मुलांना लागत आहे. तणावात असताना ते अधिक खाल्लेही जात असल्याने ते रक्तदाब वाढवत आहे.

उपाय

भाजीपाला, फळे, मासे आणि कमी फॅटच्या पदार्थासह समतोल आहार

मुलांच्या आहारातील मीठाचे प्रमाण कमी ठेवावे

अति मीठ, फॅट आणि कॅलरीज असलेले फास्टफूड टाळावे

मुलांच्या स्क्रीनटाईमवर नियंत्रण ठेवा

कुटुंबासोबत वेळ घालविण्याबरोबर खेळण्यासाठी प्रोत्साहन द्या

कारणे

मुलांमध्ये व्यायामाचा अभाव, आहार-विहाराच्या चुकीच्या सवयी

फास्टफूडची चटक लागल्याने स्थूलतेसह पचनाच्या तक्रारी

मोबाईलसह इतर गॅझेटवरील वाढता स्क्रीन टाईम

मैदानावर खेळाकडे दुर्लक्ष

मुलांबरोबरच्या संवादाचा अभाव

मोबाईल वापर कमी, आहारात बदल, मैदानावर अर्धा ते एक तास खेळ किंवा व्यायाम करावा. पालकांनी संवाद वाढवत किमान एकवेळचे जेवण मुलांसोबत केल्यास तणाव कमी होण्यास मदत होते.
- डॉ. सुरेश शिंदे, एमडी मेडिसीन, हृदयविकार तज्ज्ञ.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT