सातारा : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम रखडत-रखडत सुरू आहे. या कामात महामार्गालगतच्या हजारो वटवृक्षांची कत्तल करण्यात आली आहे. यामध्ये नैसर्गिक ऑक्सिजनचा हब असलेल्या व पर्यावरण साखळीतील महत्त्वाचा घटक असणार्या वडाच्या झाडांवरच कुर्हाड घालण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्गांप्रमाणेच राज्य व जिल्हा मार्गांलगत असणार्या वृक्षांवरही कुर्हाड चालवली जात असल्याने पाच पिढ्यांच्या श्वासावरच घाला घातला जात आहे.
कुठल्या ना कुठल्या कारणाने वटवृक्षांची बेसुमार कत्तल केली गेली आहे. रस्ते विकास महामंडळ, तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तोडलेल्या झाडांची आकडेवारीच उपलब्ध नाही. ज्या कंपनीला काम दिले, त्या कंपनीनेच भूसंपादनासह झाडेही ताब्यात घेऊन तोडली. खासगी कंपनीला आरटीआय लागू नाही, त्यामुळे वृक्षतोडीची नेमकी आकडेवारी उपलब्ध होत नाही. ऐतिहासिक वारसा असलेल्या महाराष्ट्रात शिवकालीन, तसेच ब्रिटिशकालीन वड, पिंपळाची लाखो झाडे आहेत. महामार्गनिर्मिती, जंगलात बंगला, रिसॉर्टची निर्मिती, वॉटर पार्कची उभारणी आदी कारणांसाठी वृक्षतोड केली जातेय. शासकीय काम असल्याने वृक्षप्रेमी जनतेच्या विरोधाला न जुमानता वृक्षतोड केली जाते.
पर्यावरणाचा गळा घोटून पर्यटनाच्या राबवल्या जाणार्या संकल्पना सगळ्यांना विनाशाकडे नेत आहेत. महाराष्ट्रात सर्वत्रच महामार्गांच्या निर्मितीसाठी हजारो वृक्षांवर कुर्हाड चालवली गेली आहे. रस्त्याकडेला चॉकलेटी, पांढरे पट्टे असलेली मोठाली झाडे आता नामशेष झाल्याचे चित्र आहे. पाचवड-बामणोली रस्त्यावर शेकडो वर्षांपूर्वीचे 300 वटवृक्ष ठेकेदाराच्या यंत्रणेने कापून काढले. पर्यावरणप्रेमी दिवसा विरोध करतात, म्हणून रात्रीच्या वेळी झाडांची कत्तल केली गेली. पोलादपूर-सुरुर या महामार्गावर तर पर्यावरणप्रेमींचा विरोध असूनही झाडांची कत्तल केली गेली. दै. ‘पुढारी’ने आवाज उठवल्यानंतर मंत्री मकरंद पाटील यांनाच यंत्रणेवर चाबूक हिसडायला लागला. एकाही झाडाला हात लावायचा नाही, असा सज्जड दमच त्यांनी या मूग गिळून बसलेल्या शासकीय अधिकारी व संबंधित ठेकेदाराला दिला.
पुणे-बंगळूरसह जिल्ह्यातील अन्य महामार्गांच्या रुंदीकरणावेळी तब्बल 12 हजार वृक्षांची कत्तल केली आहे. मात्र, त्यापैकी एकास पाचप्रमाणे 60 हजार वृक्ष लावण्याची सक्ती असतानाही महामार्गासह संबंधित विभागाने त्याला नकारघंटाच दिली आहे. वन विभागानेही नकार कळवल्याने राष्ट्रीय महामार्गावर वृक्ष लावण्याच्या मर्यादा स्पष्ट झाल्या, त्यामुळे पुणे-बंगळूर महामार्गासह पंढरपूर, विटा, तासगाव, लोणंद, सुरुर-पोलादपूर महामार्गांवरही वृक्षच लावण्यात आलेले नाहीत. आपल्या हद्दीतच खेळणार्या वन विभागाच्या यंत्रणेलादेखील वृक्षतोडीचे काहीच सोयरसूतक राहिलेले नाही.
पुणे-बंगळूर महामार्गाच्या सहापदरीकरणाच्या कामात जे वृक्ष तोडले आहेत, त्याच्या पाचपट वृक्ष रस्त्याचे 70 टक्के काम पूर्ण झाल्यानंतर संबंधित विभाग किंवा ठेकेदार लावण्याबाबत निर्णय घेईल, असे महामार्ग विभाग सांगत आहे; मात्र रस्त्याचे काम 70 टक्क्यांपेक्षा जास्त पूर्ण होत आले आहे. त्यामुळे वृक्ष लावण्याचे धोरण तरी किमान जाहीर करण्याची गरज आहे. ते करावे, यासाठी पर्यावरणप्रेमी आग्रही आहेत.
शेंद्रे ते कागल, पंढरपूर, तासगाव, विटा अशा रस्त्यांवरील अनेक जुन्या वृक्षांची कत्तल झाली आहे. अत्यंत जुन्या व नव्याने लावलेल्या वृक्षांचाही यात समावेश आहे. 100 वर्षे वय असलेल्या एक हजार, तर 50 वर्षे वय असलेल्या दोन हजार वृक्षांचा त्यात समावेश आहे. अलीकडच्या पाच वर्षांतील वृक्षही त्यात जमीनदोस्त झाले आहेत. वडाची शेकडो वर्षांपूर्वीची हजारो झाडे तोडली गेली आहेत, भविष्यात निसर्ग साखळीवर याचा दुष्परिणाम होणार आहे. तो वृक्षतोड करणार्यांसह सामान्य नागरिक, पशू-पक्षी यांनाही भोगावा लागणार आहे.
रस्त्याच्या कामात वृक्षतोड करणे अनिवार्य असले, तरी एका वृक्षतोडीमागे पाच वृक्षांची लागवड व संगोपनही महत्त्वाचे आहे. त्यात वृक्षांच्या लागवडीसह त्यांच्या संगोपनाविषयी ठेकेदारांना सक्ती करण्याची गरज आहे. मात्र, सुस्त शासकीय धोरणामुळे ‘बांधा... वापरा व हस्तांतरित करा’, या संकल्पनेचा पुढचा अध्याय हा ‘महामार्ग बोडका करा,’ असा तर नाही ना? अशी उद्विग्न भावना वृक्षप्रेमी करत आहेत.
वृक्षतोडीसंदर्भातील 1972 चा कायदा जोपर्यंत बदलला जात नाही, तोपर्यंत वृक्षतोडीवर निर्बंध येऊ शकत नाहीत. सह्याद्री देवराईच्या माध्यमातून सातारा, परभणी, कराड, कोल्हापूर, नाशिक, अहिल्यानगर या ठिकाणी वटवृक्षांची पुनर्लागवड आम्ही केली आहे. ही झाडे जगली आहेत. आम्ही अतिशय नम्रपणे लोकप्रतिनिधी, शासकीय यंत्रणा यांच्याकडे वृक्षतोडीत जी झाडे तोडणार आहात, ती पुनर्लागवडीसाठी आमच्याकडे द्या, अशी विनवणी केली. मात्र, यंत्रणा अतिशय सुस्त असून, कुणालाही झाडांचे देणे-घेणे नाही.- सयाजी शिंदे, अभिनेते, संस्थापक सह्याद्री देवराई