सातारा : मान्सूनपूर्व पावसाने घेतलेल्या आठ दिवसांच्या उघडीपीनंतर बुधवारी जिल्ह्यात पुन्हा पावसाने दमदार हजेरी लावली. सातारा शहर व उपनगरात सुमारे एक तास मुसळधार सरी कोसळल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले. तसेच जिल्ह्याच्या अन्य भागातही पावसाचे पुन्हा आगमन झाले आहे. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे फिरते विक्रेते, भाजी व फळविक्रेत्यांसह नागरिकांची तारांबळ उडाली. दरम्यान, सध्या ग्रामीण भागात पेरणीपूर्व मशागतीची कामे सुरू असून अचानक आलेल्या पावसामुळे या मशागतीच्या कामांचा खोळंबा झाला.
यावर्षी ऐन उन्हाळ्यात सलग दहा ते बारा दिवस पाऊस पडल्याने सरसरी पावसाची आकडेवारी ओलांडली होती. मागील आठ दिवसांपासून उघडीप दिलेल्या पावसाने बुधवारी जिल्ह्यात पुन्हा हजेरी लावली. सकाळपासूनच वातावरणात बदल जाणवत होता. कधी ऊन तर कधी आभाळ भरून येत होते. दुपारी 3 च्या सुमारास सातारा शहरातील काही भागात पावसाला सुरुवात झाली. मात्र साडेतीन वाजता सुमारे एक ते दीड तास जोरदास सरी कोसळल्या. रस्त्यांवरून पाण्याचे लोट वाहिले. मोकळ्या मैदानांवरही पाणी साठले होते. सध्या शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू असून त्यासाठी येणारे पालक पावसामुळे अडकून पडले.
पावसाच्या कोसळधारांनी विक्रेत्यांसह नागरिकांची तारांबळ उडाली. कोणाचे साहित्य भिजले तर कुणी आडोशाला आश्रय घेतला. भर पावसातच फळे व भाजी विक्रेत्यांनी साहित्यावर प्लास्टिक आवरण घातले. फिरत्या व्यावसायिकांनी मोठे दुकाने, हॉटेल्सच्या दारात आश्रय घेतला. शहर परिसरातील महामार्गासह सेवा रस्त्यांवरही पाण्याचे लोट वाहत होते.
या पाण्यातून वाट काढताना वाहनधारकांना कसरत करावी लागत होती. सध्या ग्रामीण भागात उन्हाळी घेवडा, सोयाबीन व भुईमूग काढणी सुरु आहे. आधीच मान्सूनपूर्व पावसाने काढणीस आलेल्या पिकाची काढणी करणे कठीण झाले होते. अनेकाच्या भुईमूगाच्या शेंगा उगवल्याने नुकसान झाले आहे. लागवड केलेल्या ऊसाला भर लावण्यासाठी आत्ता कुठे जमीनीला वापसा आला होता. पेरणीपूर्व मशागतीची कामे सुरु झाली होती. मात्र अचानक आलेल्या पावसामुळे या कामांचा खोळंबा झाला. आले, हळदीच्या लागवडीची कामे देखील पावसामुळे बंद करावी लागली.