पुणे-बंगळूर आशियाई महामार्गाच्या उपमार्गावर येथील हॉटेल सन्मान समोर अनेक दुचाकीस्वार रस्त्याच्या बाजूला असलेल्या गटरवरून धोकादायक प्रवास करत होते. Pudhari Photo
सातारा

Karad Rain News | पावसाने दाणादाण; भाजी विक्रेत्यांची त्रेधातिरपीट

सखल भागात साचले पाणी; महामार्गावर अनेक ठिकाणी पाण्याची मोठमोठी डबकी

पुढारी वृत्तसेवा

कराड : सुमारे आठवडाभराच्या विश्रांतीनंतर बुधवारी दुपारपासून सुरू झालेल्या पावसाने हातगाडा चालकांसह भाजीपाला विक्रेत्यांची चांगलीच तारांबळ उडवली. काही वेळातच सर्वत्र पाणीपाणी झाल्याने अनेकांची पळापळ झाली. या पावसामुळे महामार्गाच्या उपमार्गावर अनेक ठिकाणी पाण्याची मोठ-मोठे डबके तयार झाले होते. या पाण्याच्या डबक्यातून वाहन चालवताना वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत होती.

तर काही दुचाकीस्वरांनी पाण्याच्या डबक्यात दुचाकी न घालता रस्त्यालगतच्या बाजूला असलेल्या गटरवरूनच धोकादायकरीत्या दुचाकी नेल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला होता. दरम्यान, महामार्गावर अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहतूक धिम्या गतीने सुरू होती. त्यामुळे महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

या पावसामुळे सकल भागातील अनेक घरांमध्ये तर झोपडपट्टीतील काही घरांमध्ये पाणी शिरल्याने संसार उपयोगी साहित्याचे नुकसान झाले. बुधवारी सकाळपासून पावसाने उघडी दिल्याने ग्रामीण भागातील अनेक शेतकर्‍यांनी आपल्या शेतातील भाजीपाला कोयना वसाहत, कराड व मलकापूर मध्ये विक्रीसाठी आणला होता. त्यांच्यासह कराड व मलकापूर मधील भाजी मार्केटमध्ये दुपारपासून आलेल्या पावसाने भाजीविक्रेत्यांसह शेतकर्‍यांची चांगलीच धावपळ झाली. यावेळभ काही शेतकर्‍यांसह व्यापार्‍यांनी शेतीमाल पावसात भिजू नये म्हणून प्लॅस्टिकच्या कागदाने झाकून ठेवला.

दुपारी अचानक आलेल्या पावसामुळे अनेक दुकानदारानी दुकानाबाहेर ठेवलेले साहित्य भिजल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले. दरम्यान महामार्गाच्या कामामुळे कोल्हापूर नाक्यावर मलकापूर बाजूकडून कराड शहरात येणार्‍या वळण रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने दुचाकीस्वरांना कसरत करावी लागत होते. तर याच ठिकाणी महामार्गाच्या रस्त्यालगतचे गटार ओव्हरफ्लो झाल्याने परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले होते. त्यामुळे वाहनधारकांसह व्यावसायिक व परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. एकूणच काही दिवसांच्या विश्रांतीनंतर बुधवारी दुपारपासून सुरू झालेल्या मान्सूनच्या पावसाने सर्वत्र दाणादाण उडवले असून मोठ्या प्रमाणावर भाजीपाला विक्रेत्यांसह हातगाडा चालकांची त्रेधातिरपीट उडाली आहे.

सायंकाळपर्यात पावसाची रिपरिप सुरूच...

कोयना वसाहत, आगाशिवनगर तसेच कराड येथील भाजी मंडईमध्ये भाजीपाला विक्रीसाठी बसलेल्या शेतकर्‍यांसह व्यवसायिकांना पावसाचा चांगलाच फटका बसला. शेतीमाल वाचवण्यासाठी शेतकर्‍यांना कसरत करावी लागली. काही विक्रेत्यांनी पावसामुळे विक्रीसाठी आणलेला भाजीपाला प्लास्टिकच्या कागदाने झाकून ठेवला. सायंकाळपर्यंत पावसाची रिपरिप सुरूच होती. त्यामुळे अनेक शेतकर्‍यांच्या भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. तर काही ठिकाणी सकल भागातील भाजीपाल्या विक्रेत्यांचा भाजीपाला पाण्यात भिजल्याने मोठे नुकसान झाले आहे.

महामार्गावरील वाहतूक विस्कळीत...

अनेक ठिकाणी पाणी साचल्याने महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. तर मलकापूर शहरातील सकल भागात असणार्‍या घरांमध्ये पाणी शिरल्याने संसार उपयोगी साहित्य भिजून नुकसान झाले. महामार्गावर कोल्हापूर नाका, शिवाई पतसंस्था, भारत मोटर्स, सन्मान हॉटेल यासह अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचल्याने महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. त्यामुळे वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागला.

कराड मलकापूर येथील महामार्गाच्या उड्डाणपुलाचे काम अतिशय धिम्यागतीने सुरु असल्याने त्याचा त्रास वाहनधारकांसह प्रवाशी व परिसरातील नागरिकांना सहन करावा लागत आहे. आता पावसाळ्यात तर जागोजागी पाणी साचल्याने वाहनधारकांना करसत करावी लागणार आहे. याचा अनुभव पावसाळ्याच्या सुरवातीलाच येत आहे. आणखी किती दिवस लोकांना हा त्रास सहन करावा लागणार आहे? संबंधित ठेकेदाराने उड्डाणपुलाचे काम त्वरीत पुर्ण करून नागरिकांसह वाहनधारकांची गैरसोय टाळावी.
- प्रवीण गायकवाड, वाहनधारक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT