फलटण तालुक्यात रविवारी दुपारनंतर झालेल्या संततधार पावसामुळे शेतकर्‍यांच्या शेतामध्ये असे पाणी साचले आहे.  (Pudhari File Photo)
सातारा

Heavy Rainfall | फलटणमध्ये पावसाची दमदार हजेरी

संततधार पावसामुळे नदी ओढ्याकाठचे लोक धास्तावले होते.

पुढारी वृत्तसेवा

फलटण : फलटण शहरासह संपूर्ण तालुक्यात रविवारी दुपारनंतर सुरू झालेल्या पावसाने रात्रभर आपली बॅटिंग सुरू ठेवल्याने ओढे, नाले, रस्ते जलमय झाले. सखलभागात पाणी साचले होते. संथपणे वाहणारे ओढे, नाले, नद्या, खळाळून वाहू लागल्या आहेत. संततधार पावसामुळे नदी ओढ्याकाठचे लोक धास्तावले होते.

तालुक्यात जून, जुलै, ऑगस्ट मध्ये 223.6 मिलिमीटर पाऊस झाला आहे. सरासरीच्या 101.5 टक्के पाऊस पडला. 14 सप्टेंबरला 35 मिलिमीटर तर 15 सप्टेंबरच्या सकाळी साडेदहापर्यंत 63.9 मिलिमीटर एवढा पाऊस झाला आहे. सप्टेंबर महिन्यात पंधरा तारखेपर्यंत तालुक्यात सरासरी 98.9 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून महिन्यातील सरासरीच्या 128.8 टक्के एवढा पाऊस झाला आहे.

मे महिन्यात फलटण तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. रविवारच्या दमदार पावसामुळे नागरिक चिंताग्रस्त झाले होते. पावसामुळे ओढ्या, नाल्यांना भरभरून पाणी वाहत होते. शेतकर्‍यांच्या शेतामध्ये ठिकठिकाणी पाणी साचले होते. अनेक सखल भाग जलमय झाले होते. आठवडे बाजाराच्या वेळी पाऊस आल्याने भाजी विक्रेते व नागरिकांना मोठा फटका बसला. पावसामुळे विक्रीसाठी आणलेल्या भाज्यांचे नुकसान झाले. विक्रेत्यांना पावसात भिजत थांबावे लागले. खरेदीसाठी ग्राहकांची संख्या कमी झाल्याने विक्रेत्यांना मातीमोल दराने भाजी विकावी लागली. पावसामुळे शहरासह तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले होते.

काढणीस आलेल्या बाजरी व सोयाबीन पिकांना मोठा फटका बसल्याने शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे. ऊस पिकाला मात्र या पावसाचा चांगलाच फायदा होत आहे. पावसामुळे फलटण शहरातील रस्त्यावरील खड्डे जलमय झाले होते. शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांना पावसामुळे बाहेर पडणे कठीण झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT