खटाव : शनिवार व रविवारी झालेल्या जोरदार पावसाने खटाव तालुक्यातील शेतकर्यांचे आतोनात नुकसान झाले आहे. सलग दोन दिवसांच्या पावसाने अनेक ठिकणी बांध फुटून शेतातील माती आणि खरिपाची पिके वाहून गेली आहेत. सर्वच ओढे, नाले आणि येरळा नदी दुथडी भरुन वाहत असल्याने वाहतून ठप्प होण्याचे प्रसंगही उद्भवत आहेत.
चालू वर्षीच्या पावसाळ्यात खटाव तालुक्यातील सर्वच मंडलात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. खरिपाची पिके हाताला लागून बळीराजाचे अर्थकारण उभारी घेईल अशी परिस्थिती असतानाच गेल्या दोन दिवसातील जोरदार पावसाने होत्याचे नव्हते करुन टाकले आहे.
घेवडा, सोयाबीन आणि बागायती पिकांची काढणी सुरु असतानाच शनिवारी आणि रविवारी तालुक्याच्या बहुतांश भागात तुफान पावसाने हजेरी लावली. शनिवारी वडूज, गणेशवाडी, गुरसाळे, वरुड, अंबवडे, खटाव, जांब, जाखणगाव, गोपूज, बिटलेवाडीसह अनेक भागात जोरदार पाऊस झाला. रविवारीही सायंकाळी मोळ, बुध, ललगुण, पुसेगाव या तालुक्याच्या उत्तर भागासह खटावलाही दीड तास पावसाने झोडपून काढले.
सलग दोन दिवस मोठा पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी शेतात पाणी साचून राहिले तर काही ठिकाणी बांध फुटून माती आणि पिके वाहून गेली. शेतातील पाण्यात पिके खराब होवू लागली आहेत. अनेक ठिकाणी उभा उसही भुईसपाट झाला आहे. कांद्याची रोपे पाण्यात बुडाल्याने कुजून गेली आहेत. सलग दोन दिवसांच्या पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी होत आहे.
सततच्या पावसामुळे नगदी पिक असलेल्या घेवड्याच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणी चांगले आलेले घेवड्याचे पिक कुजून गेले आहे. नेमके घेवडा काढणी सुरु असतानाच पुन्हा पाऊस सुरु झाला आहे. त्यातच घेवड्याला दरही मिळेनासा झाला आहे. बाजारपेठेत घेवडा घ्यायला व्यापारी नकार देत आहेत. घेतलाच तर दीड ते हजारांचा कवडीमोल दर दिला जात असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.