उंडाळे : जुलै महिन्यात दोन आठवडे पावसाने थोडीफार विश्रांती घेतल्याने उंडाळे विभागात शेतकर्यांनी रखडलेल्या खरिपाच्या पेरण्या पूर्ण करण्यास सुरूवात केली होती. मात्र मागील आठवडाभरापासून पुन्हा जोरदार पाऊस सुरू झाल्याने पेरण्याची कामे पूर्णपणे बंद झाली आहेत. मागील दोन दिवसांपासून पावसाचा जोर ओसरल्याने शेतकर्यांनी पुन्हा एकदा पेरणी सुरू केली आहे.
कराड दक्षिण विभागातील डोंगरी विभागात जुलै महिन्यातील तिसर्या आठवड्यात सात - आठ दिवसांपासून पावसाने उघडीप दिली होती. मात्र मागील आठवड्यापासून पुन्हा अचानक पावसाने सततधार सुरू केली आहे. त्यामुळे शेतीची कामे सुरू करणार्या शेतकर्यांना पुन्हा पावसाचा अडथळा निर्माण झाला. तालुक्यात रविवारी रात्रीपासून सुरू झालेला पाऊस सोमवारी सायंकाळपर्यंत सुरू होता. त्यामुळे शेतात कुठेतरी घात येईल? अशी आशा पाळू बाळगून असणार्या शेतकर्यांची अडचण झाली आहे. काही शेतकर्यांनी घात नसतानाही ओल्या शेतात पेरणी केली आहे. दक्षिणेत सध्या खरीप हंगामाची अक्षरशः वाट लागली आहे.
काही ठिकाणी सोयाबीन, भुईमूग, भात शेतीत भांगलण व कोळपणीची कामे सुरू आहेत. तर अद्याप काही ठिकाणी पेरणी झालेली नाही. अद्यापही काही विभागात शेतात पाणी साचून राहिल्याने शेती मोकळीच पडल्याचे दिसत आहे. त्यामुळे यावर्षी खरीप हंगामात पेरणी होईल अशी शक्यता दिसत नाही. काही दिवसापूर्वी पावसाने उघडीप दिल्यामुळे माळ रानातील शेती अडचणीत आली होती. मात्र आठवडाभरापासून पडणार्या पावसामुळे या शेतीला जीवदान मिळाले आहे. तर दुसर्या बाजूला अधिक पाऊस असल्यामुळे तालुक्यात मुबलक पाणी असणार्या गावातील शेतकरी हवालदिल झाल्याचे पहावयास मिळत आहे.
अजूनही 30 टक्क्याहून अधिक क्षेत्रात पाणीच..
यावर्षी मे महिन्यातच पावसाने सुरुवात केल्यामुळे खरीप हंगामात सुरवातीला 30 ते 40 टक्केच पेरणी पूर्ण झाली आहे. मागील महिन्यात पावसाने उघडीप दिल्याने 25 ते 30 टक्के शेतकर्यांनी पेरणीची कामे उरकली आहेत. मात्र अद्यापही जवळपास 30 टक्के क्षेत्रात पावसामुळे शेतातील पाण्याचा निचरा न झाल्याने तळे निर्माण झाल्याचे पाहावयास मिळत आहे.