सातारा :
तारुण्य तुझ्या हृदयाचे
हे असेच बहरत राहो...,
वार्धक्य तुझ्या जगण्याला
हे असे विसरत राहो..!
सुप्रसिद्ध मराठी कवी सुरेश भट यांच्या एका गझलमधील या ओळी तरुणाईला दीर्घायुष्याचा मंत्र सांगतात. उत्साह व जोशपूर्ण आयुष्याची महती सांगणारे हे वास्तव आता बदलू लागलंय. तरुणाईची ‘दिल की धडकन’ वाढली असून वयाच्या ऐन तीशीतच हार्ट अटॅक येऊ लागलाय. हार्ट अटॅकच्या चार रुग्णांमधील एक रुग्ण हा 30 ते 45 वयोगटातील असल्याचे धक्कादायक वास्तव आता सातार्यासारख्या शहरात समोर आले आहे. प्रख्यात कार्डिओलॉजिस्ट डॉ. सोमनाथ साबळे यांनी याबाबतची वास्तववादी मांडणी दैनिक ‘पुढारी’शी बोलताना केली. ‘काळजी करू नका, निश्चिंत रहा’, असे सांगताना त्यांनी या तरुणाईला दीर्घायुरारोग्य जीवनाच्या टिप्सही दिल्या.
आज जागतिक हृदय दिन. यंदा या दिवसाची थीम ‘डोन्ट मिस अ बीट’ ही आहे. त्याचा उद्देश नका चुकवू हृदयाचा ठोका असा असून हा आरोग्यदायी संदेश आता सर्वांपर्यंत पोहचण्याची गरज आहे. यानिमित्ताने तरुणाईच्या दिलाचा कानोसा घेतला तर ‘धडधडणारं’ वास्तव समोर येतं. सातारा जिल्ह्यातील हृदयविकाराचे 50 टक्के रुग्ण हे उमद्या वयातील असल्याचे चित्र समोर आले आहे. ‘धडधडणारं हृदय’ हे फक्त शरीराचं नव्हे तर तरुणाईचं स्वप्न, उमेद आणि उर्जा याचं प्रतीक असतं. पण हीच धडधड आज ताण तणाव, चुकीचा आहार, अतिव्यस्त दिनचर्या, अपुरी झोप, अनुवांशिकता व निष्काळजीपणामुळे मंदावू लागली आहे. सातारा जिल्ह्यातील 30 ते 45 या वयोगटांमध्ये हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण अधिक असल्याचे वास्तव चित्र डॉ. सोमनाथ साबळे यांनी ‘पुढारी’शी बोलताना रेखाटले.
ते म्हणाले, एकेकाळी हृदयविकार हा शब्द ऐकला की डोळ्यासमोर वृद्ध माणूस यायचा, पण आज चित्र बदललंय. कॉलेजच्या वर्गात, ऑफिसच्या खुर्चीत, मित्रांच्या मैफिलीत किंवा जिममध्ये घाम गाळणार्या तरुणांमध्ये अचानक हार्ट अटॅक येत असल्याचे चित्र सातारा जिल्ह्यातील अनेक घटनांमध्ये दिसून आले आहे. तरुणाईच्या छातीत धडधडणार्या या हृदयांमागे गंभीर जोखीम लपली आहे. हृदयविकारामुळे जगभरात सर्वाधिक मृत्यू होतात. अशा परिस्थितीत हृदयाची विशेष काळजी घेतली पाहिजे.
आजकाल तरुणांना हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण अधिक आहे. जगभरात सर्वाधिक तरुणांचा देश म्हणून भारताकडे पाहिले जाते. मात्र भारतातील हीच तरुणाई बदलती जीवनशैली, वाढता तणाव, आहार व व्यायाम यांच्या बिघडलेल्या संतुलनाने विविध व्याधींनी ग्रासली आहे. यामध्ये सर्वाधिक चिंतेची बाब म्हणजे तरुणांमध्ये वाढणारे हृदयविकाराचे प्रमाण. कमी वयात अचानक हृदयविकाराचा झटका येणार्या तरुणांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सातारा जिल्ह्यात आढळून येणार्या चार हृदयविकार रुग्णांमध्ये एक रुग्ण हा वयाच्या 30 ते 45 या दरम्यानचा असल्याचे डॉ. सोमनाथ साबळे यांनी सांगितले.
जिल्ह्यात दर महिन्याला 300 अँजिओप्लास्टी
सातारा जिल्ह्यात महिन्याला सुमारे 300 अँजिओप्लास्टी होत आहेत. त्यामध्ये सातारा शहरात 100, तर कराडला 175 अँजिओप्लास्टी होत आहेत. अँजिओप्लास्टी हार्ट अटॅक आल्यानंतरच केली जाते, हा गैरसमज लोकांमध्ये दृढ असल्याचे कार्डिओलॉजिस्ट डॉ. सोमनाथ साबळे यांनी सांगितले. काही रूग्णांमध्ये अगोदरच हार्ट अटॅकची लक्षणे असतात. तपासणीनंतर ती पुढे येतात. त्यावेळी अगोदरच अँजिओप्लास्टी करून रूग्ण सुरक्षित राहू शकतो, असे त्यांनी सांगितले.
सातारा जिल्ह्याला 2011 मध्ये मिळाले पहिले प्रख्यात कार्डिओलॉजिस्ट
सातारा जिल्ह्याच्या वैद्यकीय क्षीतिजावर खर्या अर्थाने 2011 नंतर अमूलाग्र बदल झाला. हृदयविकारावरील उपचार पद्धतीचा विचार करायचा झाल्यास 2011 पर्यंत सातारा जिल्ह्यात एकही कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर नव्हते. 2011 मध्ये डॉ. सोमनाथ साबळे यांच्या रूपाने सातारा जिल्ह्याला नामवंत असे पहिले प्रख्यात कार्डिओलॉजिस्ट मिळाले. त्यांच्या रूपाने सातारा जिल्ह्यातील हार्ट अटॅक येणार्या रुग्णांना त्वरित व अत्युच्च वैद्यकीय उपचार मिळू लागले. त्यातून अनेकांच्या आयुष्याला नवसंजीवनी प्राप्त झाली. सद्यस्थितीत सातारा जिल्ह्यात एकूण सात कार्डिओलॉजिस्ट आहेत. त्यामध्ये सातारा चार व कराडमधील तीन कार्डिओलॉजिस्ट यांचा समावेश आहे. पुणेसारख्या ठिकाणी सुमारे अडीचशे कार्डिओलॉजिस्ट असून सातारा जिल्ह्याचा विचार केला, तर कार्डिओलॉजिस्ट यांची संख्या तुलनेने खूपच कमी असल्याचे दिसून येते.
तरूणाईंमध्ये हार्ट अटॅकचे प्रमाण वाढले आहे. विशेषत: 30 ते 45 या वयोगटात हा धोका अधिक जाणवतो. मात्र, त्यामुळे तरूणांनी घाबरून जाण्याचे काहीही कारण नाही. हृदयाच्या सावध हाका निट ऐका. जीवनशैलीत बदल करा, ताणतणाव टाळा. नियमित व गरजेपुरता व्यायाम, पुरेशी झोप, वेळच्यावेळी तपासणी, योग्य आहार याबाबी तरूणांना हृदयविकारापासून सुरक्षित ठेवू शकतात.-डॉ. सोमनाथ साबळे, सुप्रसिद्ध कॉर्डिओलॉजिस्ट, सातारा