सातारा : यंदाचा गणेशोत्सव महिला आणि गणेशभक्तांसाठी विशेष ठरणार आहे. तब्बल ३१ वर्षांनंतर हरतालिका पूजन आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी येत असल्याने सकाळी हरतालिकेची पूजा आणि त्यानंतर बाप्पाच्या स्वागताची तयारी, अशी महिलांची दुहेरी लगबग पाहायला मिळणार आहे.
सुवासिनी आणि कुमारिका श्रद्धेने हरतालिका व्रत करतात. देवी पार्वतीने भगवान शंकरांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली. त्यातून हरतालिका व्रताची परंपरा सुरू झाल्याचे मानले जाते. सुवासिनी पतीच्या दीर्घायुष्यासाठी व उत्तम आरोग्यासाठी, तर कुमारिका मनासारखा पती मिळावा यासाठी हे व्रत करतात.
यंदा सोमवार, दि. १४ रोजी सकाळी ७.०६ वाजेपर्यंत तृतीया तिथी आहे. त्यामुळे सूर्योदयानंतर तृतीया असतानाच हरतालिका पूजन करणे योग्य असल्याचे पंचांगकर्त्यांनी सांगितले आहे. त्यानुसार सकाळी ६.१५ ते ७.०६ या कालावधीत हरतालिका पूजन करता येणार आहे. त्यानंतर सकाळी ७.०६ वाजता चतुर्थी सुरू होईल. चतुर्थी सुरू झाल्यानंतर मध्यान्ह काळात गणेशमूर्तीची स्थापना करावी. पंचांगानुसार गणेशपूजेचा मध्यान्हकाळ दुपारी १.४० वाजेपर्यंत असल्याचे सांगण्यात आले आहे. हरतालिका पूजन आणि गणेशमूर्ती स्थापना एकाच दिवशी असली, तरी दोन्ही पूजा एकाच वेळी करू नयेत, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
दरवर्षी गणेशोत्सवाच्या आदल्या दिवशी हरतालिका पूजन केले जाते. मात्र, यंदा दोन्ही सण एकाच दिवशी आल्याने महिलांना सकाळी हरतालिका पूजन करून त्यानंतर गणरायाच्या स्थापनेची तयारी करावी लागणार आहे. यापूर्वी २९ ऑगस्ट १९९५ रोजी तृतीयायुक्त चतुर्थीचा असा योग आला होता. त्यानंतर आता तब्बल ३१ वर्षांनी हा दुर्मीळ योग जुळून आला आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा ठरणार असून, गणेशभक्तांमध्येही या योगाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
पूजन व स्थापना वेळ
हरतालिका पूजन : सकाळी ६.१५ ते ७.०६
चतुर्थी प्रारंभ : सकाळी ७.०६
गणेशमूर्ती स्थापना : मध्यान्ह काळात
गणेशपूजेचा मध्यान्हकाळ : दुपारी १.४०