Shiv Jayanti: राजधानीत आज शिवजयंतीचा शाही सोहळा Pudhari
सातारा

Shiv Jayanti: राजधानीत आज शिवजयंतीचा शाही सोहळा

साताऱ्यातील अवघा माहोल शिवमय : हत्ती, घोडे, उंट, चित्ररथाचे मुख्य आकर्षण

पुढारी वृत्तसेवा

सातारा : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून राजधानी साताऱ्यात शाही सोहळा संपन्न होत आहे. साताऱ्यासह जिल्ह्यातील अवघा माहोल भगवा झाला असून गुरुवारी जिल्हाभर विविध विधायक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. साताऱ्यात शिवजयंती महोत्सव समिती व नगरपालिकेच्या वतीने भव्य मिरवणूक काढली जाणार आहे. त्यामध्ये सहभागी हत्ती, घोडे, उंट, चित्ररथ हे मुख्य आकर्षण ठरणार आहे.

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सवाची उत्सुकता ऐतिहासिक साताऱ्यात शिगेला पोहोचली आहे. शिवजयंती महोत्सव समिती राजधानी सातारा व नगरपालिका यांच्यासह विविध संघटनांनी शिवजयंतीची जय्यत तयारी केली आहे. राजपथ तसेच प्रमुख मार्गावर उभारलेल्या आकर्षक व ऐतिहासिक भव्य कमानी आणि भगव्या रंगाच्या झालरी यांनी साताऱ्याचे रुपडे पालटले आहे. सातारा शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जयंती उत्सवादरम्यान मागील दोन दिवसांपासून विविध कार्यक्रमांची रेलचेल सुरू आहे. अनेक ठिकाणी चित्ररथ व देखाव्यांची कामे युद्धपातळीवर सुरू होती.

जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय, नगरपालिका व जिल्हा प्रशासन यांच्या वतीने गुरुवार, दि. 19 रोजी सकाळी 7 वाजता ‌‘जय शिवाजी, जय भारत‌’ पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या पदयात्रेत केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे उपस्थित राहणार आहेत. तसेच 10 हजारपेक्षा जास्त युवक, शालेय विद्यार्थी या रॅलीत सहभागी होणार आहेत.

गुरुवार, दि. 19 रोजी भव्य शोभा यात्रा काढण्यात येणार आहे. सायंकाळी 5 वाजता गांधी मैदान, राजवाडा येथून या शोभायात्रेस प्रारंभ होणार आहे. ही शोभायात्रा सायंकाळी 8 वाजता शिवतीर्थ, पोवई नाका येथे पोहोचणार आहे. त्यानंतर खा. श्री. छ. उदयनराजे भोसले, ना. शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांची महाआरती होणार आहे. फटाक्यांची आतिषबाजी तसेच छत्रपती शिवरायांच्या नवीन पूर्णाकृती पुतळ्याचा भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे.

जिल्ह्यातही ठिकठिकाणी शिवजयंती सोहळ्यांचे आयोजन करण्यात आले आहे. गावोगावी शिवप्रतिमांची प्रतिष्ठापना करुन अभिवादन करण्यात येणार आहे. लेक लाडकी अभियानाच्यावतीने किल्ले अजिंक्यतारा येथे अनोखी शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे. यानिमित्त अजिंक्यताऱ्यावरील राजसदरेवर ‌‘शिवाजी कोण होता‌’ या पुस्तकातील उताऱ्याचे सामूहिक वाचन केले जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT