कराड : कराड जिल्ह्याच्या दृष्टीने प्रशासकीय विकासात आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या नव्या कार्यालयीन इमारतीच्या बांधकामास मंजुरी देण्यात आली आहे. सुमारे 1 कोटी 93 लाख 55 हजार रुपयांच्या निधीतून ही आधुनिक इमारत उभारली जाणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागातून देण्यात आली. शासकीय विश्रामगृहाच्या जवळ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पूर्वीच्या जागेवरच बांधकाम विभागाची प्रशस्त इमारत उभा राहणार आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दि. 26 फेब्रुवारी 2026 या आदेशानुसार या प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या भव्य इमारतीचा प्रस्ताव आ.डॉ.अतुलबाबा भोसले यांनी शासनाकडे मांडला होता. कराड शहराच्या वाढत्या प्रशासकीय गरजा लक्षात घेऊन ही इमारत आधुनिक पद्धतीने उभारण्यात येणार आहे. नवीन इमारतीत नागरिकांसाठीही विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
तळमजल्यावर वाहनतळाची व्यवस्था करण्यात येणार असून, कार्यालयीन कामासाठी येणाऱ्या नागरिकांना बसण्यासाठी स्वतंत्र प्रतीक्षा कक्ष उभारला जाणार आहे. त्यामुळे नागरिकांना उन्हात किंवा रस्त्यावर थांबण्याची वेळ येणार नाही. पहिल्या मजल्यावर सार्वजनिक बांधकाम विभाग, उपविभाग कराड यांचे मुख्य कार्यालय कार्यरत राहणार आहे. प्रशस्त कार्यालयीन जागा, दस्तऐवज साठवणूक, बैठकींसाठी स्वतंत्र कक्ष आणि कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक सुविधा यामुळे विभागाचे काम अधिक कार्यक्षम होण्यास मदत होणार आहे.
विशेष म्हणजे, दुसरा मजला आगामी मार्ग प्रकल्प विभागासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. भविष्यात कराड परिसरातील रस्ते, पूल आणि इतर पायाभूत सुविधा प्रकल्पांची संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन ही दूरदृष्टी ठेवण्यात आली असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकल्पामुळे कराड जिल्ह्याच्या दृष्टीने टाकलेले आणखी एक पाऊल आहे. बांधकाम भवनमुळे प्रशासकीय विकासाला चालना मिळणार असून, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कामकाज अधिक सुसूत्र आणि नागरिकाभिमुख होणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.