शिवथर : आरफळ (ता. सातारा) गावच्या हद्दीत रविवारी फोनवरून झालेल्या संभाषणाच्या वादातून एकाने पत्नीच्या डोळ्यादेखत पतीच्या डोक्यात खोरे घालून खून केल्याची घटना घडली. यामध्ये अमर मुगुटराव नलगे (वय 40, रा. आरफळ) यांचा मृत्यू झाला. ऋषिकेश मारुती कासकर (25) हा संशयित आरोपी पसार झाला.
आरफळ-वनगळ रस्त्यालगत ‘गावंदर’ शिवारात अमर नलगे व त्यांची पत्नी रेश्मा नलगे शेतात फ्लॉवर काढत होते. दुपारच्या सुमारास नलगे याचा कासकरसोबत फोनवरून संवाद झाल्यानंतर तो थेट शेतात आला. त्यानंतर दोघांमध्ये अमर नलगे यांच्या मुलावरून वाद सुरू झाला.
यामध्ये नलगे यांच्या पत्नीने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या वादाचे रूपांतर भांडणात होऊन संतापाच्या भरात कासकर याने नलगे यांच्या पत्नीसमोरच खोऱ्याने अमर नलगे यांच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला. यामध्ये अमर नलगे हे गंभीर जखमी झाले. यानंतर पत्नी व ग्रामस्थांनी नलगे यांना उपचारासाठी वाहनात नेले. मात्र, रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले.
कर्ते पुरुष गेल्याने संकटांचा डोंगर
नलगे हे पूर्वी वाई अर्बन बँकेत कार्यरत होते. सध्या ते सातारा एमआयडीसीमध्ये काम करत होते. त्यांच्या मागे आई, पत्नी, मुलगी व मुलगा असा परिवार आहे. विशेष म्हणजे, सहा महिन्यांपूर्वी त्यांच्या वडिलांचा कृष्णा नदीमध्ये बुडून मृत्यू झाला होता. यानंतर आता अवघ्या सहा महिन्यांत घरातील कर्त्या पुरुषाचा मृत्यू झाल्याने नलगे कुटुंबीयांवर संकटांचा डोंगर कोसळला आहे.