सातारा

Ajit Pawar | कला परंपरेचा समृद्ध वारसा शासन जतन करणार: उपमुख्यमंत्री अजित पवार

औंध वस्तू संग्रहालयाचा 52 कोटींचा आराखडा मंजूर

पुढारी वृत्तसेवा

औंध : ऐतिहासिक वास्तूंचे जतन संवर्धन करणे ही सर्वांची जबाबदारी आहे. राज्यातील कला परंपरेचा समृद्ध वारसा जतन करण्यासाठी शासन कटीबद्ध असून औंध येथील वस्तू संग्रहालयाचे जतन व संवर्धनासाठी शासनाने 52 कोटी रुपयांचा आराखडा मंजूर केला आहे. पर्यावरणाचा समतोल राखून, ऐतिहासिक वारसा जपत संग्रहालयाचे नूतनीकरण करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

औंध येथील शिवानंद स्वामी संगीत प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित 85 व्या औंध संगीत महोत्सवात ते बोलत होते. यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, खा. नितीन पाटील, आ. सचिन पाटील, पुणे मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलिस अधीक्षक तुषार दोशी, गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी, महाराष्ट्र शासनाच्या पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष व दै. ‌‘पुढारी‌’चे निवासी संपादक हरिष पाटणे, संस्थेचे सचिव अरुण कशाळकर, पंडित सुरेश तळवलकर, उल्हास कशाळकर, प्रभाकर घार्गे, शिवानंद प्रतिष्ठानच्या विश्वस्त अपूर्वा गोखले, पल्लवी जोशी, उदयसिंह पाटील, अनिल देसाई, अधिक्षक अभियंता संतोष रोकडे, प्रभाकर देशमुख, बाळासाहेब सोळस्कर, कार्यकारी अभियंता श्रीपाद जाधव, उपअभियंता संजय खोत, प्रशांत खैरमोडे, राजेश पाटील-वाठारकर, संदीप चव्हाण उपस्थित होते.

ना. अजित पवार म्हणाले, स्वातंत्र्यपूर्व काळापासून औंध संस्थान हे केवळ प्रशासकीय दृष्टिकोनातून नव्हे तर कलात्मक दृष्टिकोनातून आदर्श संस्थान म्हणून ओळखले जाते. संगीत, साहित्य, नाट्य, चित्रकला आणि नृत्य या सांस्कृतिक क्षेत्रांना औंध संस्थांनी राजाश्रय दिला. त्या काळातील दूरदृष्टी ही अत्यंत महत्त्वाची होती. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साताऱ्याच्या भूमीमध्ये जन्माला आले. साहित्य, कला, संस्कृती, क्रीडा आदी सर्वच क्षेत्रात येणाऱ्या असुविधा सोडवण्यासाठी प्रयत्न करायचा हा त्यांचा विचार घेऊन शासन काम करत आहे, असे सांगून भविष्यात शिवानंद प्रतिष्ठानला संगीत सेवा निरंतर चालू ठेवण्यासाठी निवासी गुरुकुल निर्माण करण्यासाठी सर्व सुविधा पुरवून सर्वतोपरी मदत करण्यात येईल, असे ते म्हणाले.

ना. अजित पवार म्हणाले, औंधचे तत्कालीन राजे बाळासाहेब पंतप्रतिनिधी अतिशय दूरदृष्टीचे शासक आणि प्रशासक होते. अप्रतिम असे वस्तुसंग्रहालय त्यांनी तयार केले. त्या वस्तू संग्रहालयाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व उपाययोजना करून नूतनीकरण करण्यात येईल. पर्यटनाला जास्तीत जास्त प्रोत्साहन देण्यावर शासनाचा भर आहे. ज्याप्रमाणे आपल्या तत्कालीन राजांनी कला, संस्कृती आणि मानवतेचे पुरस्कर्ते म्हणून काम केले त्याप्रमाणे शासन काम करत आहे. राजा हा प्रजेचा मायबाप मानला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांनी लोकशाहीचा पाया रचला. हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यातून त्यांनी रयतेचे राज्य ही संकल्पना वास्तवात उतरवली. त्याच परंपरेचा वारसा औंध संस्थानचे राजे बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांनी पुढे नेला.

भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी 10 वर्षे आधी पंतप्रतिनिधींनी औंध संस्थानची सत्ता जनतेच्या हातात देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. या संस्थानने लोकांना स्वतःचा प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार दिला असल्याचेही ते म्हणाले.

प्रास्तविक अरुण कशाळकर यांनी केले. संगीत महोत्सवाच्या माध्यमातून प्रबोधनाचे काम होत असल्याचे सांगून निवासी गुरुकुल उभारण्यासाठी शासनाने मदत करावी, अशी विनंती केली. व कला मंदिराच्या अद्ययावतीकरणासाठी करण्यात आलेल्या मदतीबद्दल आभार मानले. यावेळी ना. अजित पवार यांच्या हस्ते शिवानंद स्वामी संगीत प्रतिष्ठानच्या ‌‘रियाज‌’ स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT