फलटण : फलटण तालुक्यात झालेल्या मान्सूनपूर्व पावसाने प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानीचे 80 टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत. सर्व पंचनाम्यांचा अहवाल शासनास प्राप्त होताच शासन निर्णयानुसार जी मदत शासन मान्य करेल, ती मदत तातडीने संबंधितांच्या खात्यावर वर्ग केली जाईल. शासन आपत्तीग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी दिली.
पाच-सहा दिवसांपूर्वी अतिवृष्टीने फलटण तालुक्यात प्रचंड नुकसान झाले आहे. त्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी ना. मकरंद पाटील शनिवारी फलटण तालुक्याच्या दौर्यावर आले होते. पाहणी दरम्यान माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी आ. सचिन पाटील, प्रांताधिकारी प्रियंका आंबेकर, उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस, मुख्याधिकारी निखिल मोरे, तहसीलदार डॉ. अभिजित जाधव, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवरूपराजे खर्डेकर, डी. के. पवार, महायुती घटक पक्षातील पदाधिकारी उपस्थित होते.
ना. मकरंद पाटील म्हणाले, मान्सूनपूर्व तयारीच्या मिटिंग व अन्य कामामुळे अतिवृष्टीची पाहणी करण्यासाठी येण्यास विलंब झाला. मात्र आ. सचिन पाटील यांच्या सतत संपर्कात होतो. अतिवृष्टी झाल्याची माहिती मिळताच आयुक्त स्तरावरून नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याची सूचना मी स्वतः आयुक्त, जिल्हाधिकार्यांना दिल्या होत्या. तशा प्रकारचे निर्देश मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनीही दिले होते. सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी सध्या फिल्डवर पंचनामे करत आहेत. 80 टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत. अद्यापही पंचनामे बाकी आहेत. पंचनाम्यांची मुदत संपलेली नाही. सरासरीपेक्षा अधिक प्रमाणात पाऊस झाल्याने नुकसान मिळण्यास कोणतीही अडचण येणार नाही.
शासकीय निकषाच्या बाहेर जाऊन मदत करण्याची गरज असल्याचे पत्रकारांनी विचारताच ना. पाटील म्हणाले, शासकीय निकषाच्या बाहेर जाऊन वेगळी मदत करता येत नाही. निकषानुसार जी मदत देय असेल ती तातडीने संबंधितांच्या खात्यावर वर्ग केली जाईल. शासकीय निकषाच्या बाहेर जाऊन यापूर्वी अनेकदा मदत केली गेली आहे. मात्र आत्ताची परिस्थिती वेगळी आहे. सध्याच्या काळात पूर्वीपेक्षा शासन जास्तीत जास्त मदत देत असल्याचेही ते म्हणाले. दरम्यान, ना. मकरंद पाटील यांनी सुरवडी, ठाकूरकी, पद्मावती देवी मंदिर जवळील पूल, हरिभाऊ मंदिराजवळील पूल, शनिनगर, जिंती नाका आदी ठिकाणांची पाहणी केली.
फलटण शहरातील रस्त्यांची डागडुजी पालखीपूर्वी पूर्ण केली जाईल. तसेच पालखीसाठी आवश्यक असणार्या सर्व सुविधा चांगल्या प्रकारे पुरवण्यासाठी शासनाचे सर्व विभाग सतर्क असतात त्या त्या विभागांची सर्व तयारी सुरू असल्याचे ना. मकरंद पाटील यांनी सांगितले.