पुसेसावळी : खटाव तालुक्यातील गोरेगाव वांगी परिसरात बापाला रॉडने मारहाण करून त्याच्या मुलीची छेडछाड केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. औंध पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा नोंदवून एकाला अटक केली आहे. उर्वरित तिघांचा शोध सुरू आहे. ही घटना दि. 3 डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता घडली.
गणेश कुंडलिक पाटोळे (रा. गोरेगाव वांगी) असे पोलिसांनी अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. तर सुजल तात्यासो मदने, श्रावण संजय चव्हाण व ओम अरुण जाधव (सर्व रा. गोरेगाव वांगी) हे पसार असून पोलिस यांचा शोध घेत आहेत. याबाबत अनिल अशोक पवार (वय 37, रा. गोरेगाव वांगी) यांनी औंध पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, पुसेसावळी-गोरेगाव वांगी रस्त्यावरील पिराचे मंदिर परिसरात गणेश पाटोळे, सुजल मदने, श्रावण चव्हाण व ओम जाधव या चौघांनी अनिल पवार यांची मोटरसायकल अडवून कोणतेही कारण नसताना त्यांना मारहाण केली.
तसेच, शिवीगाळ व दमदाटी केली. याचवेळी अनिल पवार यांच्या मुलीची छेडछाड केली. या प्रकरणी औंध पोलिस ठाण्यात पोक्सोंतर्गत गुन्हा नोंद झाला आहे. एका संशयिताला ताब्यात घेतले असून अन्य संशयितांचा पोलिस तपास करत आहेत. तपास पोनि गणेश वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अनिल शिरोळे करत आहेत.