सातारा : अमेरिका आणि व्हेनेझुला यांच्यात झालेला ड्रामा आणि इराणमध्ये सुरू असलेले मोठे आंदोलन यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलासह सोने व चांदीच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. बुधवारी सोन्यामध्ये प्रतितोळा एक हजार तर चांदीत प्रति किलो 9 हजार रूपयांची वाढ नोंदवली गेली. चांदीचा वापर केवळ दागिनेच नव्हे तर सौरऊर्जा प्रकल्प, इलेक्ट्रिक वाहने, पॉवर ग्रिड आणि इलेक्ट्रिकल उपकरणांमुळे मागणी वाढली आहे. उत्पादन कमी आणि मागणी जास्त असल्याने चांदीच्या किमतीमध्ये वाढ होत आहे.
सराफ बाजारात मकर संक्रातीला चांदीचा प्रतिकिलो दर 2 लाख 80 हजार रुपये, तर सोन्याचा प्रतितोळा दर 1 लाख 43 हजार रुपये इतका होता. यंदा चांदीच्या दरात तब्बल 27 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता गुंतवणूक क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. गेल्या वर्षी चांदीने गुंतवणूकदारांना तब्बल 170 टक्के परतावा दिला आहे. सध्या बाजारात चांदीची मागणी जास्त आहे आणि पुरवठ्याअभावी किमती सातत्याने वाढत आहेत.
दरम्यान, जागतिक बाजारात सोने-चांदीचे भाव आज मोठ्या प्रमाणात वाढले, त्याचे प्रतिबिंब भारतीय बाजारातही उमटले. चांदीच्या भावात एका दिवसात 6 टक्क्यांची वाढ होऊन तो प्रति किलो 2,80,000 रुपयांच्या नव्या उच्चांकावर पोहोचला. तर सोने 22 कॅरेट दर 1 लाख 31 हजार आणि 24 कॅरेटचा दर 1 लाख 43 हजार प्रतितोळा इतका राहिला. दररोज दरात वाढ होत असल्याने नागरिकांचा खरेदीकडे कल कमी झाला आहे.