नवीन महाबळेश्वर प्रकल्पाची माहिती देताना अधिकारी, शेजारी आ. शशिकांत शिंदे, राजेंद्र राजपुरे, संजय गायकवाड व इतर. Pudhari Photo
सातारा

नवीन महाबळेश्वर प्रकल्पाला जावली, महाबळेश्वरमधून विरोध

नावावरच आक्षेप; अडचणी सोडवा

पुढारी वृत्तसेवा

नवीन महाबळेश्वर प्रकल्पातील महाबळेश्वर या नावाला आमचा विरोध आहे. यापूर्वी तालुक्यात झालेले झोन्स व सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामुळे ग्रामस्थांचे वाटोळे झाले आहे. या नवीन प्रकल्पामुळे स्थानिकांच्या हाती काय लागणार? हा प्रकल्प राबवताना स्थानिकांच्या अडचणी सोडवा; मगच प्रकल्प कार्यान्वित करावा, अशा सूचना ग्रामस्थ व महाबळेश्वरमधील लोकप्रतिनिधींनी केल्या.

नवीन महाबळेश्वर विकास योजनेवर स्थानिकांना सूचना मांडता याव्यात यासाठी महाबळेश्वर पंचायत समितीमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांनी आपले गार्‍हाणे मांडले. या बैठकीस आ. शशिकांत शिंदे, जिल्हा बँक संचालक राजेंद्र राजपूरे, माजी सभापती संजूबाबा गायकवाड, रस्ते विकास महामंडळाचे नगर रचना संचालक जितेंद्र भोपळे,उपमुख्य नियोजनकार उदय चंदर, उपसंचालक नगरचना प्रभाकर नाळे, तहसिलदार तेजस्विनी पाटील, गटविकास अधिकारी अरुण मरभळ, वनक्षेत्रपाल गणेश महांगडे सहा गटविकास अधिकारी सुनील पार्टे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. यावेळी आ. शिंदे यांनी रस्ते विकास महामंडळ शहरालगतच्या क्षेत्राचा विकास करण्यासाठी आहे. मात्र, महाबळेश्वरमध्ये हे महामंडळ अचानक कुठून आले?

दुर्गम व पर्यावरण संवेदनशील भागात ही योजना राबविण्यात मागील शासनाचा नेमका उद्देश काय? असे शिंदे यांनी विचारून जमिनींचे दर वाढविण्यासाठी तर हा प्रकल्प जाहीर केला नाही ना? असा सवालही केला. या प्रकल्पामुळे स्थानिकांना काय फायदा होणार? मूळ महाबळेश्वरचा विषय अद्यापही प्रलंबित असताना नवीन महाबळेश्वचा घाट का? असा सवाल करत स्थानिकांना विश्वासात घेवून शासनाने काम करावे, अशी सूचना केली.

राजेंद्र राजपुरे म्हणाले, याचा विकास आराखडा तयार करताना पारदर्शकता असली पाहिजे. यासाठी संबंधित खात्याच्या कार्यालयाला देखील सोबत घेतले पाहिजे. येथील पर्यावरणाचा विचार करत येथील जागेच्या खरेदी विक्रीवर व विकासावर निर्बंध आणले पाहिजेत, असे सांगितले. यावेळी गणेश उतेकर यांनी नदी किनारी गावे असलेल्या गावांना आराखड्यामध्ये समाविष्ट करून त्यांना पर्यटनाच्या विशेष सवलती मिळाव्यात, अशी सूचना केली. माजी नगरसेवक कुमार शिंदे, रविंद्र कुंभारदरे, डी. एम. बावळेकर, प्रवीण भिलारे, नितीन भिलारे यांच्यासह ग्रामस्थांनी महाबळेश्वर नावाला आक्षेप असल्याचे सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT