सातारा : राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन गुरुवारी दुपारी जलमंदिर पॅलेसवर आले हेोते. यावेळी त्यांनी राजमाता श्री. छ. कल्पनाराजे भोसले आणि खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली.
जलमंदिर येथे खा. उदयनराजे भोसले यांनी महाजन यांचे स्वागत केले. दोन्ही नेत्यांमध्ये बराच काळ गप्पागोष्टी रंगल्या होत्या. यावेळी महाजन यांनी उदयनराजेंच्या प्रकृतीची विचारपूस केली. याचवेळी उदयनराजेंनी महाजन यांना आयुर्वेदिक औषध खायला दिले. या भेटीबाबत विचारले असता महाजन म्हणाले, दिल्लीपासून गल्लीपर्यंत आमचे आलबेल चालले आहे. अनेकवेळा मी इथे आलेलो आहे. विशेष काही राजकीय चर्चा नव्हती. आईसाहेबांना मला भेटता आल्याचे महाजन म्हणाले.
त्याचवेळी उदयनराजेंनी महाजन यांच्यासोबत कॉलेजची चर्चा झाल्याचे सांगितले. जी आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही आणि तुम्ही पण विचारू पण नका, अशी मिश्किली करताच हशा पिकला. उदयनराजेंची भेट घेऊन महाजन पुण्याच्या दिशेने रवाना झाले. यावेळी आ. मनोजदादा घोरपडे, जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व अर्थ समितीचे सभापती सुनील काटकर, प्रतापगड प्राधिकरण समितीचे सदस्य काका धुमाळ, पंकज चव्हाण, विनित पाटील प्रमुख उपस्थित होते.