Ginger 
सातारा

Ginger prices: आले दर झाले दुप्‍पट; प्रती गाडी दर ४७ ते ४९ हजारांवर

महिनाभरात विक्रमी सुधारणा : शेतकऱ्यांना दिलासा

पुढारी वृत्तसेवा

सातारा : गेल्या महिनाभरात आल्याच्या दरात मोठी उसळी पहायला मिळाली आहे. प्रति गाडी (५०० किलो) दर थेट ४७ ते ४९ हजार रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. अवघ्या एका महिन्यात आल्याचे दर जवळपास दुप्पट झाल्याने आले उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही महिन्यांपासून कमी दर, वाढते उत्पादन खर्च आणि पाणीटंचाई यामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना या दरवाढीने दिलासा मिळाला आहे.

जिल्ह्यात सध्या आल्याच्या आवकेत घट झाली असून त्याचवेळी बाजारातील मागणी वाढल्याने दरात ही तेजी निर्माण झाली आहे. व्यापाऱ्यांकडून आल्याला चांगली मागणी असल्याने आगामी काळातही दर चांगला राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या जिल्ह्यातील आले लागवड अंतिम टप्प्यात असून काही भागांत पाणीटंचाईमुळे लागवडीला अडथळे निर्माण झाले आहेत. तरीही दरातील या सुधारित स्थितीमुळे उशिरा का होईना, जिल्ह्यात सरासरी क्षेत्राइतकी लागवड पूर्ण होईल, असा अंदाज आहे.

आल्याच्या बाजारभावात गेल्या काही महिन्यांत मोठे चढ-उतार पाहायला मिळाले. मार्च महिन्यात आल्याला प्रतिगाडी अवघे १८ ते २२ हजार रुपये दर मिळत होते. या तुलनेत उत्पादन खर्च जास्त असल्याने शेतकऱ्यांना अपेक्षित नफा मिळत नव्हता. याच काळात आले बियाण्याला २५ ते ३० हजार रुपये दर मिळत होता. त्यानंतर काही प्रमाणात बाजारात हालचाल सुरू झाली. मे महिन्यात प्रतिगाडी दर १८ हजारांपासून २६ हजार रुपयांपर्यंत वाढले.

मात्र, ही वाढही शेतकऱ्यांसाठी पुरेशी नव्हती. मे महिन्यात पाणीटंचाई, पिकाच्या व्यवस्थापनातील अडचणी आणि बाजारातील अनिश्‍चितता यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आले काढणीस प्राधान्य दिले होते. जुने-नवे आले खरेदीत गोंधळ निर्माण होईल. या भीतीनेही काही शेतकऱ्यांनी माल बाजारात लवकर आणला. परंतु, त्यानंतर परिस्थितीत हळूहळू सुधारणा झाली. आल्याच्या पिकांची वाढ चांगली होत राहिली. आवक कमी झाली आणि बाजारातील मागणी वाढत गेल्याने सध्याच्या दरांनी थेट ४७ ते ४९ हजार रुपयांचा टप्पा गाठला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT