तासवडे टोलनाका : पन्नास वर्षांपासून घोणशी गावचा सिटी सर्व्हे व्हावा म्हणून संघर्ष करणार्या घोणशी ग्रामस्थांच्या व्यथा दै. ‘पुढारी’ने मांडल्या होत्या. याची दखल घेत तहसीलदार कल्पना ढवळे व कराड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रताप पाटील यांनी मंडल अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी यांची बैठक घेतली.
बैठकीत औंध संस्थानाकडे गावचा जुना नकाशा पाहणे व घोणशी गावच्या ग्रामपंचायतीच्या 8 अ उतार्याला नोंद असणार्या मिळकतींची यादी तयार करण्यास सांगितली आहे. सिटी सर्व्हेबाबत विशेष ग्रामसभा घेऊन ग्रामसभेचा ठराव 15 ऑगस्टच्या आत कराड तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना सादर करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे गावचा सिटी सर्व्हे होण्यासाठी प्राथमिक हालचाल सुरू झाल्या आहेत.
दै. ‘पुढारी’ने ‘घोणशी गाव हरवलं प्रशासनाला नाही सापडलं’ तसेच ‘घोणशीच्या अस्तित्वासाठी अनेकदा आंदोलने’ हे सचित्र वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर प्रशासन जागे झाले. घोणशी गावच्या प्रश्नासाठी प्रांतअधिकार्यांनी बैठक आयोजित केली होती. परंतु प्रशासकीय कामामुळे ही बैठक तहसीलदार कल्पना ढवळे यांनी घेतली. बैठकीस कराड तहसीलदार ढवळे,गटविकास अधिकारी पाटील, विस्तार अधिकारी विकास स्वामी, मंडलअधिकारी पेंडसे, तलाठी राजेश देशमुख व ग्रामविकास अधिकारी प्रसाद यादव उपस्थित होते.
बैठकीत घोणशी गावासंदर्भातील मागील 50 वर्षांतील सर्व कागदपत्रे तपासण्यात आली. परंतु सरकारी दप्तरी कागदपत्रे नाहीत हे निदर्शनास आले. त्यानंतर तहसीलदार ढवळे यांनी ग्राम विकास अधिकारी प्रसाद यादव यांना ग्रामपंचायत स्थापने पासून ते 1957/58, 1982 ,2001 ते 2025 ला घोणशी ग्रामपंचायतीच्या 8 अ उतार्यावरील सर्व नोंदीच्या तीन याद्या तयार करण्यास सांगितली आहे. तसेच सिटी सर्व्हेबाबत घोणशी मधील प्रत्येक ग्रामस्थाला नोटीस पाठवून ग्रामसभा घेण्यास सांगितले आहे. ग्रामसभेत याबाबत ठराव घेण्याचे आदेश दिले आहेत.
घोणशी ग्राम विकास अधिकार्यांनी या सर्व गोष्टी 15 ऑगस्टच्या पूर्ण करायचे आहेत. दरम्यान गेल्या पन्नास वर्षांपासून गावाचा सिटी सर्व्हे व्हावा म्हणून संघर्ष करणार्यांना घोणशी ग्रामस्थांना दै. ‘पुढारी’ने पाठपुरावा केल्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. प्रशासनाच्या सिटी सर्व्हे बाबत हालचाली गतिमान झाल्या आहेत. सिटी सर्व्हे होण्यासाठी प्राथमिक स्वरूपातील ही माहिती अत्यंत महत्त्वाची असून यामुळे ग्रामस्थांना न्याय मिळणार आहे.
घोणशी गावा संदर्भात औंध संस्थानाकडे नकाशा उपलब्ध होतो आहे का हे पाहण्यात येत आहे. अन्यथा घोणशी ग्रामसेवकांना 1957, 1982 व 2001 ते 2025ला ग्रामपंचायतीच्या 8 अ उतार्यावरील सर्व नोंदीची तीन याद्या तयार करण्यास सांगितले आहे. तसेच विशेष ग्रामसभा घेऊन ग्रामसभेचा ठराव या तिन्ही गोष्टी दाखल केल्यानंतर सिटी सर्व्हे होण्यासाठी पुढील निर्णय प्रक्रिया सुरू होणार आहे.
2021 ला घोणशी गावाचा ड्रोन सर्व्हे करण्यात आला होता.ड्रोन सर्व्हे झाल्यानंतर याद्वारे नकाशा तयार करण्यात येणार होता. त्यानंतर या नकाशावर घोणशी ग्रामस्थांच्या हरकती नोंदवल्या जाणार होत्या, असे प्रशासनाकडून 2021 ला ड्रोन सर्व्हे वेळी सांगण्यात आले होते. मात्र 2021 ला ड्रोन आले, गावावर फिरले जे गेले ते ड्रोनही तिकडेच आणि हरकतीही तिकडेच.