ढेबेवाडी : कराड तालुक्यातील घारेवाडी-येणके-किरपे-तांबवे मार्गाची अक्षरशः चाळण झाली आहे. कराड - चिपळूण आणि कराड - ढेबेवाडी मार्गासह पुणे - बंगळूर महामार्गाला जोडणाऱ्या मार्गापैकी एक पर्यायी मार्ग म्हणूनही या मार्गाची ओळख आहे. मात्र घाटमाथा आणि कोकण विभागाला जोडणारा महत्त्वपूर्ण मार्ग सध्यस्थितीत अक्षरशः उध्वस्त झाला आहे. त्यामुळेच प्रवाशांना प्रचंड हाल सोसावे लागत आहेत. वारंवार स्थानिक ग्रामस्थांनी मागण्या करूनही बांधकाम विभागाचे लक्ष न वळल्याने जनतेत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. एखादी मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी तरी हा रस्ता तातडीने दुरुस्त करा, अशी मागणी पुन्हा जोर धरत आहे.
पोतले, येणके तसेच परिसरातील ग्रामस्थांच्या माहितीनुसार, कराड-ढेबेवाडी रस्त्यावर घारेवाडी फाट्यावरून पुढे जाणारा हा रस्ता कोकण व घाटमाथा जोडणारा अत्यंत महत्त्वपूर्ण मार्ग आहे. या मार्गाने प्रवास केल्यास कोल्हापूर जिल्ह्यातील मलकापूर-शेडगेवाडी-उंडाळे-कोळेवाडी किंवा शेडगेवाडी-उंडाळे-विंग-घारेवाडी मार्गे कराडला वळसा घालण्याची गरज राहत नाही. यामुळे प्रवाशांचा किमान 15 ते 20 किलोमीटरचा प्रवास वाचतो. केवळ लोकांचा वेळच वाचतो असे नाही तर इंधन बचतीतून देशाचे परकीय चलनही वाचत असल्याने हा मार्ग आर्थिक दृष्टीनेही महत्त्वाचा मानला जातो.
मात्र गेल्या दोन वर्षांहून अधिक काळ या रस्त्याची दुरवस्था कायम आहे. घारेवाडी-पोतले या दोन किलोमीटरच्या पट्ट्यात 15-15 फुटांचे, संपूर्ण रुंदी व्यापणारे खोल खड्डे पडले आहेत. खडी रस्त्यावर विस्कटून पडल्याने वाहन चालवताना रस्त्याची तांबड फूटायची वेळ येते. विशेषतः दुचाकीस्वारांची मोठी कसरत होत असून या खड्ड्यांमुळे आतापर्यंत 6-7 किरकोळ अपघातही झाले आहेत. रात्रीच्या वेळी किंवा पावसात हा धोका अधिक वाढतो. घारेवाडी ते पोतले या दोन किलोमीटरच्या अंतरात रस्त्याची झालेली दुरवस्था, पडलेले खोल खड्डे व वाढता अपघातांचा धोका लक्षात घेता संबंधित विभागाने तातडीने उपाययोजना करून दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.