तारळे : तारळे परिसर हा डोंगर विभागात पसरला आहे. वर्षभर निसर्गाचे अनेक चमत्कार येथे अनुभवायला मिळत असतात. या परिसरात सध्या भात -नाचणीच्या पिकांमुळे हिरवाई पसरली असून शेतातून सुगंधाची उधळण होत आहे. पावसाच्या उघडीपीने सर्वत्र अल्हाददायक वातावरण असून पर्यटक आणि प्रवाशांना सुखद अनुभव मिळत आहे.
डोंगर दर्यांनी व्यापलेल्या तारळे विभागात अतिवृष्टी होत असते. याच बरोबर सोसाट्याचा वाराही वाहत असतो. डोंगर पठारावर उतरत्या छपराची घरे व फक्त खुरट्या वनस्पती व वेली वाढलेल्या दिसून येतात. वार्याच्या प्रचंड वेगामुळे झाडांची वाढ खुंटत असते. भात व नाचणी शिवाय इतर पिकेही तग धरत नाहीत. यामुळे पठार परिसरात हीच दोन मुख्य पिके घेतली जातात.
डोंगर उतारावर असणार्या गावात वेगळी परिस्थिती दिसून येते. पाठराप्रमाणेच पावसाचे प्रमाण असलेल्या तरी डोंगरामुळे वार्याचा जोर कमी होत असल्यामुळे दाट झाडी दिसून येते. डोंगर उतारावर गावे वसल्याने तेथील शेतीही डोंगर उतारावरच टप्प्या टप्प्याची दिसून येते. अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर भात पिकाचे उत्पन्न घेतले जाते. डोंगराखालील सखल भागात भात, सोयाबीन,भुईमूग, हायब्रीड, घेवडा व इतर कडधान्याचे उत्पादन घेतले जाते. तारळे - पाटण रस्त्याने प्रवास करताना निसर्गाची विविध रूपे अनुभवायला मिळतात.
तारळेवरून पाटणला जाण्यासाठी वजरोशी-बांधवाट- सडावाघापूर- सडाकळकी -गुजरवाडी - पाटण तर आंबळे - मरळोशी -जळव - मणदुरे - पाटण असे दोन मार्ग असून दोन्ही मार्गाने जाताना घाट लागतो. घाट रस्त्याने जाताना रस्त्यालगत भात शेती मोठ्या प्रमाणात दिसून येते. कुठे सखल भागात तर कुठे डोंगर उतारावर टप्प्या टप्प्याने तयार केलेली शेती दिसून येते.यामध्ये भात व नाचणीची पिके डोलताना दिसून येत आहेत. सध्या या रस्त्याने जाताना भात शेती असणार्या ठिकाणी तांदळाचा वास दरवळत आहे. पावसाची उघडझाप,हिरवीगार झाडी, गवताच्या गालीच्याने व्यापलेले पठार, दाट धुके अशा आल्हाददायक वातावरणात प्रवास करताना पर्यटकही आनंदून जात आहेत. येथील निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी प्रतिवर्षी वाढत आहे.
यंदा सलग पडलेल्या पावसाने शेतात मेहनती करता आल्या नाहीत. तरवे दोन टप्प्यात टाकावी लागली. बेंदूर सनाच्या आसपास पहिल्या टप्प्यातील टाकलेली तरवे लागणी झाली. त्याला चांगला फुटवा आला आहे. पण त्यानंतर लागणी झालेली तरवे उशिरा लागली आहेत. यामुळे त्यांच्या फुटीवर परिणाम झाला आहे.- बाळासाहेब सूर्यवंशी बाजार समिती संचालक