खवैयांच्या आखाडी पार्ट्यांना बहर (Pudhari File Photo)
सातारा

Gatari Amavasya Feast | खवैयांच्या आखाडी पार्ट्यांना बहर

Chicken Goat Demand Gatari | कोंबड्या, बोकडांचा पडतोय फडशा : गटारी अमावस्येला सांगता

पुढारी वृत्तसेवा

सातारा : आषाढ महिनाअखेर जवळ आल्याने आखाडी पार्ट्यांना बहर आला आहे. ग्रामीण भागातही आखाडी यात्रांची धांदल सुरु असून कोंबड्या-बकर्‍यांना मागणी वाढली आहे. दररोज शेकडो कोंबड्या, बोकडांचा फडशा पडू लागला आहे. श्रावण मास सुरु होत असल्याने गटारी अमावस्येला आखाडी पार्ट्यांची सांगता होणार आहे.

सध्या आषाढ महिना संपत असून श्रावण सुरु व्हायला अवघे तीन दिवस उरले आहेत. श्रावण महिन्यात अनेक कुटुंबांमध्ये मांसाहार वर्ज केला जातो. या पार्श्वभूमीवर घरोघरी आखाड साजरा केला जात आहे. मांसाहार प्रेमींच्या आखाडी पार्ट्यांना बहर आला आहे. हॉटेल-धाब्यांसह शेत-शिवारे, फार्महाऊसवर मांसाहाराच्या जेवणावळींना प्राधान्य दिले जात आहे. ग्रामीण भागात खरीप हंगामातील पेरण्यांची लगबग सुरु आहे. त्यामुळे शेतातच आखाडीचे नियोजन केले जात आहे.

आखाडीचे लोण शहरापर्यंत पोहोचले असून शहरवासीयांकडून मोठ्या प्रमाणावर मांसाहाराच्या जेवणावळींचे बेत आखले जात आहेत. हॉटेल-ढाब्यांवर खवैयांची गर्दी वाढली आहे. तसेच निसर्गरम्य ठिकाणांचा शोध घेतला जात आहे. आखाडीसाठी दररोज शेकडो कोंबड्या, बोकडांचा फडशा पाडला जात आहे. माशांनाही मागणी वाढली आहे. बुधवार दि.23 जुलै रोजी गटारी अमावस्येला आखाडीची सांगता होणार आहे.दरम्यान, ग्रामीण भागात आषाढ महिन्यामध्ये म्हसोबाला कोंबड्यांचा बळी देवून जेवणावळी घालण्याची प्रथा अद्यापही रुढ आहे. ग्रामीण भागात गावोगावी आखाडी यात्रांची लगबग सुरु आहे. विशेषत: काळ्या कोंबड्यांना प्राधान्य दिले जात असल्याने मागणी वाढली आहे. जीभेचे चोचले वगळता ज्या उद्देशाने कोंबड्यांचा बळी दिला जातो, त्यानुसार विज्ञान युगातही अंधश्रध्देला खतपाणी घातले जात आहे.

दोन दिवस खवैयांची गर्दी कायम राहणार...

यावर्षी आषाढ महिन्यातील अमावस्या बुधवार व गुरुवार अशी दोन दिवस विभागून येत असून शुक्रवारी श्रावण सुरु होत आहे. मात्र अनेक कुटुंबांमध्ये गुरुवारी मांसाहार वर्ज्य असतो. मांसाहार प्रेमींसाठी मंगळवार व बुधवार हे दोनच दिवस उरल्याने मांसाहारावर ताव मारला जाणार आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांमध्ये मासे, मटण, चिकण विक्रेत्यांच्या दुकानांमध्ये तसेच हॉटेल, ढाब्यांवर खवैयांची गर्दी कायम राहणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT