कराड : विजेच्या ट्रान्सफार्मरवर वानराने उडी मारल्याने शॉर्ट सर्किट होऊन लागलेल्या आगीत लाखो रूपयांच्या केबल व गॅस पाईप लाईनसाठी वापरले जाणारे साहित्य जळून खाक झाले. गोटे (ता. कराड) गावच्या हद्दीत पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गानजीक गुरूवारी दुपारी ही घटना घडली. घटनेची नोंद करण्याची कार्यवाही सायंकाळपर्यंत शहर पोलीस ठाण्यात सुरू होती.
पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील सेवा रस्त्यावर मागील अडीच ते तीन वर्षापासून गॅस पाईप लाईन टाकण्याचे काम सुरू आहे. बीपीसीएल या कंपनीकडून हे काम सुरू असून कंपनीने पाईप लाईन टाकण्यासाठी एका ठेकेदारास ठेका दिला आहे. या ठेकेदाराने कराडजवळील गोटे गावच्या हद्दीत पुणे - बंगळूर महामार्गालगत एका जागेवर गॅस पाईप लाईनसाठी आवश्यक पाईप, केबल, जमिनीतून गॅस पाईप लाईन नेण्यासाठी क्रॉम्प्रेरसर यासह अन्य साहित्य ठेवले आहे. संबंधित ठेकेदाराला कंपनीकडून या साहित्याचा पुरवठा केला जातो, अशी चर्चा घटनास्थळी सुरू होती.
दरम्यान, गुरूवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास याच परिसरात असलेल्या ट्रान्सफार्मरवर एका वानराने अचानकपणे उडी मारली. त्यामुळे शॉर्ट सर्किट झाले. संबंधित ट्रान्सफार्मरनजीक मोठ्या प्रमाणावर केबल, गॅस पाईप तसेच अन्य साहित्य ठेवण्यात आले होते. त्याचबरोबर या परिसरात मोठ्या प्रमाणावर गवत व झाडी उगवली होती. मागील काही दिवस पडणार्या कडक उन्हामुळे हे गवत व झाडी पूर्णपणे वाळली होती. त्यामुळे शॉर्ट सर्किट होताच काही क्षणातच आगीचा भडका उडाला. वाळलेले गवत व झाडीसह केबल व पाईपला प्लास्टिक कोटिंग असल्याने काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले होते.