तासवडे टोलनाका: वहागाव,तळबीड, बेलवडे हवेली परिसरातील गॅस ग्राहकांना ऑनलाईन गॅस सिलिंडर बुक केल्यानंतरही गॅस मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. गॅस सिलिंडर गॅस वितरकाने घरपोच देण्याचे आहे, तरीही गॅस सिलिंडर आणण्यासाठी तळबीड येथील गॅस एजन्सीवर जावे लागत आहे. या प्रकारामुळे तळबीड येथील गॅस वितरकाविरोधात ग्राहकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. पुरवठा विभागाने तळबीड येथील गॅस एजन्सीवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
दोन महिन्यापासून गॅस सिलिंडरची ट़ंचाई निर्माण झाली आहे. सर्वसामान्यांचे दैनंदिन जीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. अनेक वेळा बुकिंगचा प्रयत्न केला तरी बुकिंग नंबर लागत नाही. किंवा प्रक्रिया पूर्ण होत नाही. हा प्रकार गेल्या महिनाभरापासून सुरू आहे. काही ठिकाणी बुकिंग झाल्यानंतरही अनेक दिवस गॅस वितरण होत नसल्याने महिला वर्गाला अडचणींना सामोरे जावे लागत आहे. नागरिकांची नाराजी दिवसेंदिवस वाढत आहे.
दरम्यान तळबीड येथे वाघजाई देवी गॅस एजन्सी असून या गॅस एजन्सीकडे वहागाव, तळबीड, बेलवडे हवेली या परिसरातील गॅस वितरणाचे काम आहे. परिसरातील नागरिकांनी गॅस बुकिंग केल्यानंतर गॅस सिलिंडर वितरणाची तारीख मोबाईल वर येत आहे. परंतु त्या तारखेला गॅस मिळत नाही. याबाबत स्थानिकांच्या अनेक तक्रारी आहेत. अनेकांनी बुकिंग करून दोन महिने होऊन गेले तरी त्यांना गॅस सिलेंडर मिळाला नाही. शासनाने प्रत्येक गॅस वितरकाला गॅस सिलिंडर घरपोच देण्यासाठी वाहतुकीचे पैसे दिले आहेत. तरीही वाघजाई देवी गॅस वितरकाकडून घरपोच गॅस सिलिंडर दिले जात नसल्याच्या तक्रारी आहेत.