फलटण : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फलटण शहर पोलिसांनी केलेल्या एका महत्त्वपूर्ण सर्वेक्षणात, फलटणकरांनी डीजे संस्कृतीला ठामपणे नाकारले आहे. शहरातील शांतता, सुव्यवस्था आणि ध्वनीप्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी ‘डीजे हवा की नको?’ या प्रश्नावर तब्बल 82 टक्के नागरिकांनी पारंपरिक वाद्यांना पसंती देत ‘ग्रीन सिग्नल’ दिला आहे, तर डीजेला स्पष्टपणे ‘रेड सिग्नल’ दाखवला आहे.
गेल्या काही वर्षांपासून गणेशोत्सवात डीजेमुळे होणारे ध्वनी प्रदूषण, रुग्णालयातील रुग्णांना होणारा त्रास आणि अपघातांची वाढती शक्यता यामुळे सुज्ञ नागरिकांमध्ये विरोधाची भावना वाढत होती. याउलट, ढोल-ताशा, लेझीम, झांज पथक यांसारखी पारंपरिक वाद्ये उत्सवाला एक पारंपरिक आणि मंगलमय स्वरूप देतात, ही भावना या सर्वेक्षणातून प्रकर्षाने समोर आली आहे.
फलटण शहर पोलिसांनी घेतलेल्या या सर्वेक्षणात 889 नागरिकांनी सहभाग घेतला. यामध्ये 16 ते 45 वर्षांवरील सर्व वयोगटातील नागरिकांचा समावेश होता.
82% नागरिकांनी पारंपरिक वाद्यांना, तर केवळ 14% नागरिकांनी डीजेला पसंती दिली. 74% नागरिकांनी डीजेला थेट विरोध दर्शवला, तर 79% नागरिकांच्या मते गणेशोत्सव साजरा करण्यासाठी डीजेची मुळात आवश्यकताच नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन करणार्यांवर गुन्हे दाखल करून डीजे जप्त करावा, असे कठोर मत 60% नागरिकांनी नोंदवले आहे.
नागरिकांनी आपला कौल स्पष्टपणे दिल्यानंतर आता सर्वांचे लक्ष फलटण पोलिस प्रशासनाच्या भूमिकेकडे लागले आहे. फलटणकर नागरिकांनी दिलेल्या या अभिप्रायाचा पोलीस प्रशासन सन्मान करणार का? यावर्षी फलटणला खर्या अर्थाने ‘डीजेमुक्त’ गणेशोत्सव साजरा करता येणार का? आणि नियमांचे उल्लंघन झाल्यास कठोर कारवाई होणार का? यांसारख्या प्रश्नांची उत्तरे आता प्रशासनाच्या कृतीतूनच मिळतील. नागरिकांच्या या स्पष्ट मतप्रवाहानंतरही जर प्रशासनाने ठोस पावले उचलली नाहीत, तर त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल जनतेमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे.