सातारा : गणेशोत्सवातील ध्वनीप्रदूषण रोखण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व जिल्हा पोलिस यांच्या पथकामार्फत सातारा जिल्ह्यातील प्रत्येक गणेशोत्सव मंडळाच्या साऊंड सिस्टिमच्या आवाजाच्या नोंदी घेण्यास सुरुवात झाली आहे. ध्वनी मर्यादेचे उल्लंघन केल्यास मंडळांवर फौजदारी गुन्हे दाखल होणार आहेत. दरम्यान, विसर्जन मिरवणुकांवेळीही आवाजाच्या मर्यादेवर संबंधित पथक करडी नजर ठेवणार आहे.
सातारा जिल्ह्यात सर्वत्र गणेशोत्सवास उत्साही व जल्लोषी वातावरणात सुरूवात झाली आहे. गेल्या अनेक वर्षामध्ये सणासुदीच्या काळात किंवा एखाद्या विशेष प्रसंगी मोठ्या आवाजामुळे होणार्या त्रासांनी डोकेवर काढले आहे. वास्तविक ध्वनी प्रदूषण हा प्रदूषणाच्या बाबतीत सर्वात शेवटी विचार केला जाणारा प्रकार आहे. परंतू आता ध्वनी प्रदूषण हे सर्वात पुढे आले आणि अग्रक्रमाने विचार करायला लावणारे प्रदूषण झाले आहे. ध्वनी प्रदूषण ही जगभरात वाढत चाललेली समस्या आहे. जसजशी लोकसंख्या वाढत आहे. तसतशी शहरी भागात आवाजाची पातळी वाढत आहे. गणेशोत्सवात दरवर्षी वाढत असलेल्या ध्वनीप्रदुषणाविरोधात ज्येष्ठ नागरिकांसह सर्वसामान्य नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
सातार्यात तर ज्येष्ठ नागरिकांनी मोर्चा, निदर्शने करत प्रशासनाला निवेदनही दिले. लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या उत्सवाचे मूळ उद्दीष्ट हरवत चालले आहे. सार्वजनिक गणेशोत्सवात मौजमजेसाठी मोठ्या आवाजात गाणी ऐकणे हा वेगळा भाग पण भक्तीपर गाण्याऐवजी बीभत्स, कर्णकर्कश गाणी लावण्याचे काहीही कारण नाही त्यासाठी कायद्याच्या अनुषंगाने आवाजसंहिता आवश्यक आहे. त्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व जिल्हा पोलिस दलाची संयुक्त बैठकही पार पडली. त्यासाठी ध्वनीप्रदूषणाच्या नोंदी घेण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक पोलिस ठाण्यांनी पथक स्थापन केले आहे. मिरवणुकीदरम्यान हे पथक आवाजाच्या नोंदी घेणार आहे. मंडळांनी ध्वनीप्रदूषणाचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हे व डिजे सिस्टिम जप्त सारखी कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मंडळांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करुन गणेशोत्सव सोहळा उत्साहात साजरा करावा.
गणेशोत्सवादरम्यान होणारे प्रदूषण रोखण्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. प्रत्यक्ष आवाजाची मोजणी आणि उल्लंघन करणार्या मंडळावर पोलिस व प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून संयुक्तीक कारवाई करण्यात येणार आहे.-अमोल सातपुते, उपप्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, सातारा