सातारा : गणेशोत्सवानिमित्त कोकणात गावी जाणाऱ्या गणेशभक्तांना यंदा शासनाकडून दिलासा मिळणार आहे. गणेशोत्सवाच्या कालावधीत कोकणाकडे जाणाऱ्या गणेशभक्तांच्या वाहनांना पथकरातून (टोल) सवलत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली.
११ सप्टेंबर ते २७ सप्टेंबर २०२६ या कालावधीत मुंबई-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८, मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीतील कोकणाकडे जाणाऱ्या संबंधित मार्गांवरील नाक्यांवर ही टोलमाफी लागू राहणार आहे. याशिवाय नगरविकास विभागाच्या अखत्यारीतील अटल बिहारी वाजपेयी शिवडी- न्हावा शेवा अटल सेतूमार्गे कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या वाहनांनाही टोल माफीचा लाभ मिळणार आहे.
मुंबई, ठाणे, पुणे आणि राज्यातील इतर शहरांमध्ये वास्तव्यास असलेले हजारो कुटुंबीय गणेशोत्सवासाठी मूळ गावी कोकणात जात असतात. या काळात मुंबई-गोवा महामार्गासह कोकणाकडे जाणाऱ्या प्रमुख मार्गांवर वाहतूक वाढते. गणेशभक्तांचा हा प्रवास अधिक सुलभ, सुरक्षित आणि आनंददायी व्हावा, तसेच त्यांना प्रवासादरम्यान अनावश्यक आर्थिक भार सहन करावा लागू नये, यासाठी शासनाने टोलमाफीचा निर्णय घेतला आहे. मंत्री शिवेंद्रराजे यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक बांधकाम विभागाने याबाबत ८ सप्टेंबर रोजी शासन परिपत्रक जारी केलेे.
या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागासह पोलीस, वाहतूक पोलीस, प्रादेशिक परिवहन विभाग आणि राज्य मार्ग परिवहन महामंडळाने परस्पर समन्वयाने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. गणेशभक्तांना टोलमाफीचा लाभ घेताना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी 'गणेशोत्सव २०२६ कोकण दर्शन' अशा आशयाचे स्वतंत्र स्टिकर किंवा पास उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यावर संबंधित वाहनाचा क्रमांक आणि चालकाचे नाव नमूद केले जाणार आहे. परिवहन विभाग, वाहतूक पोलीस, पोलीस विभाग आणि संबंधित प्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्या समन्वयातून आवश्यक त्या ठिकाणी हे पास उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.
संबंधित जिल्ह्यांतून कोकणाकडे रवाना होणाऱ्या एसटी बससाठी आवश्यक पास संबंधित पोलिस किंवा प्रादेशिक परिवहन विभागामार्फत उपलब्ध करून देण्यात येतील. पथकरमाफीचा पास बसला लावून किंवा दाखवून संबंधित बसना टोल नाक्यावरून सवलतीचा लाभ मिळणार आहे.
गणेशोत्सव हा प्रत्येकाच्या भावनेशी जोडलेला सण आहे. लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी कोकणातील आपल्या गावी जाणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास सुरक्षित, सुलभ आणि आनंददायी व्हावा, यासाठी शासनाने टोलमाफीचा निर्णय घेतला आहे. गणेशभक्तांना प्रवासादरम्यान कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी संबंधित सर्व यंत्रणांनी समन्वयाने आणि संवेदनशीलतेने काम करावे.- ना. शिवेंद्रराजे भोसले