Maharani Tararani memorial conservation: महाराणी ताराराणी समाधी संवर्धनाला चालना Pudhari
सातारा

Maharani Tararani memorial conservation: महाराणी ताराराणी समाधी संवर्धनाला चालना

राज्याच्या अर्थसंकल्पात निधीची तरतूद; ना. शिवेंद्रराजे व ‌‘पुढारी‌’चा पाठपुरावा निर्णायक

पुढारी वृत्तसेवा

सातारा : सातारा शहरालगत असलेल्या तसेच कृष्णा व वेण्णा या दोन नद्यांच्या संगमावर वसलेल्या संगममाहुली येथील महाराणी ताराराणी, छत्रपती शाहू महाराज (पहिले) तसेच महाराणी येसूबाई यांच्या स्मारकाच्या संवर्धनासाठी तसेच कृष्णा नदीवरील काशी विश्वेश्वर मंदिर, रामेश्वर मंदिर तसेच नदी परिसरातील घाट व अन्य सुशोभिकरणासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात शुक्रवारी सुमारे 133 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली.

यामुळे संगममाहुली येथील राजघराण्यातील समाधीस्थळांचे संवर्धन व संगोपन होऊन पर्यटनाला चालना मिळणार आहे. दरम्यान, यासंदर्भातील दै.‌‘पुढारी‌’च्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आल्यामुळे इतिहासप्रेमींनी ‌‘पुढारी‌’लाही धन्यवाद दिले आहेत.

संगम माहुलीमध्ये छत्रपती शाहू महाराज, महाराणी ताराराणी यांची समाधी अत्यंत शांत आणि पवित्र वातावरणात आहे. संगमाच्या बाहेरच्या बाजूस गावात महाराणी येसूबाई यांचीही समाधी आहे. ही समाधी मूळ संगम परिसरात बांधण्याचा विचार सुरू होता. सर्व समाधीस्थळांचे संवर्धन व संगोपन झाले पाहिजे, यासाठी दै.‌‘पुढारी‌’ने आवाज उठवल्यानंतर या विषयात छत्रपती घराण्याचे वारसदार सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले व खा. उदयनराजे भोसले यांनी लक्ष घातले.

ना. शिवेंद्रराजे भोसले यांनी जिल्हा प्रशासनासोबत बैठक घेतली होती. वास्तुविशारद इंद्रजीत नागेशकर यांनी संगम माहुली येथील प्रस्तावित स्मारक जतन व संवर्धनातील तयार केलेल्या आराखड्याच्या चित्रफीतद्वारे तसेच प्रत्यक्ष घटनास्थळावर जाऊन माहीती घेतली.

संगममाहुली येथे थोरले शाहू महाराज, महाराणी ताराराणी आणि महाराणी येसूबाई यांची स्मारके एकत्रित जतन व संवर्धन करणे, संगममाहुली येथील सर्व मंदिरांची डागडुजी व संवर्धन करणे, पर्यटन वाढीच्या दृष्टीने घाट विकसीत करणे, विद्युत व्यवस्था करणे, नदीकाठी होणाऱ्या दशक्रिया विधीच्या जागा सोयी सुविधांनी विकसित करणे, वृक्षारोपण करणे, येथील रस्त्याचे कॉक्रीटीकरण करणे, तसेच पार्किंग व्यवस्था करणे, पर्यटकांना विविध सोयी सुविधा निर्माण करणे, स्वच्छतागृह बांधणे, नदीवरून पलिकडे पायी जाण्यासाठी नदीवरील केबल ब्रिजची पुनर्बांधणी करणे, संपूर्ण परिसर विकसित करून येथील ग्रामपंचायतीला उत्पन्न वाढीचे स्त्रोत निर्माण करणे याबाबत निर्णय घेतला.

हा परिसर विकसित करताना ऐतिहासिक धर्तीवर बांधकाम करणे आणि नदीतील पुराच्या पाण्यामुळे कोणतीही हानी पोहचू नये, यासाठी विशेष आराखडा तयार करण्यात आला. हा आराखडा राज्य शासनास सादर केल्यानंतर शुक्रवारी राज्याच्या अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यात आली. ना. शिवेंद्रराजे भोसले यांनी लक्ष घातल्याने आणि दै.‌‘पुढारी‌’ने याबाबत आवाज उठवल्यामुळे संगममाहुली परिसराला चालना मिळणार असून येथील ऐतिहासिक स्थळांचा विकास होऊन पर्यटनवाढीस मदत होणार आहे.

संगम माहुली येथील महाराणी ताराराणीच्या समाधी दुरवस्थेबाबत ‌‘पुढारी‌’ने अनेकदा आवाज उठवला होता. यासंदर्भात मी सातत्याने जिल्हा प्रशासनाच्या बैठका घेतल्या. राज्य सरकारकडे याबाबत आम्ही आराखडा पाठवला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात महाराणी ताराराणी यांच्या समाधी परिसराच्या सुशोभिकरणासाठी भरीव निधी दिला आहे. त्याबद्दल मी अत्यंत समाधानी आहे. व्यक्तिगत माझ्यासाठी सुद्धा हे एक समाधानी कार्य आहे.
- ना. शिवेंद्रराजे भोसले, सार्वजनिक बांधकाम मंत्री, महाराष्ट्र

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT