खटाव : थोर समाजसुधारक सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त दि. 3 जानेवारी रोजी नायगाव येथे सावित्रीमाई उत्सवाचे आयोजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत केले जाणार आहे. समाजातील सर्व घटकांना विशेषत: सावित्रीच्या लेकींना प्रेरणादायी ठरणार्या या उत्सवाच्या आयोजनासाठी ग्रामविकास आणि पंचायतराज विभाग मंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत 15 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्याचा अध्यादेश काढण्यात आला आहे.
सातारा जिल्हा परिषदेच्या अभियान व्यवस्थापन कक्षाकडून थोर समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्ताने नायगाव येथे आयोजित सावित्रीमाई महोत्सवाच्या आयोजनासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान कक्षाकडे निधीची मागणी करण्यात आली होती. सावित्रीच्या लेकींना प्रेरणा देणार्या या महोत्सवांतर्गत महिला स्वयंसहाय्यता गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन आणि महिला सक्षमीकरणाचे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून महिलांना आर्थिक उन्नतीच्या संधी उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. नायगावमधील दि. 3 जानेवारी रोजीच्या आयोजित कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातून 15 लाखांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
यापूर्वी या कार्यक्रमासाठी तुटपुंजा निधी दिला जात होता. आता या वर्षीपासून 15 लाखांचा निधी मिळणार असल्याने सावित्रीबाई फुले जयंतीचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर आयोजित करता येणार आहेत.