सातारा

राज्यात फळांच्या निर्यातीला चालना मिळणार

दिनेश चोरगे

सातारा; पुढारी वृत्तसेवा :  राज्यातील फळे, भाजीपाला व फुलांच्या उत्पादन प्रक्रियेसह विपणन आणि निर्यातीला चालना देण्यासाठी राज्यात मॅग्नेट प्रकल्प कार्यान्वीत केलेला आहे. मुल्य साखळी विकसीत करणे व त्यात खाजगी गुंतवणूकदार आकर्षित करणे, काढणी पश्चात नुकसान कमी करणे, साठवणूक क्षमता वाढविणे, मागणीनुसार शेतमालाचे मुल्यवर्धन करणे, अन्नाची वितरण व्यवस्था कार्यक्षम करणे व शेतकरी उत्पादक संस्थांचा मुल्यसाखळीमध्ये सहभाग वाढविणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे.

पात्र लाभार्थ्यांमध्ये शेतकरी उत्पादक संस्था (कंपनी कायदा व सहकारी संस्था कायदा) या अंतर्गत नोंदणी झालेल्या शेतकरी संस्था, आत्मा नोंदणीकृत शेतकरी गट, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत प्रोत्साहित प्रभाग संघ, महिला आर्थिक विकास महामंडळाद्वारे प्रोत्साहित लोकसंचलित साधन केंद्र तसेच शेतकरी उत्पादक कंपनी आणि त्यांचे फेडरेशन असोशिएशन्स) आणि मुल्यसाखळी गुंतवणुकदार (शेतकरी उत्पादक कंपनी नसलेल्या मात्र, कोणत्याही फलोत्पादन पिकांच्या उत्पादकाबरोबर तसेच उत्पादकांच्या सहकारी संस्थांबरोबर सक्रियपणे कामकाज करत असलेल्या संस्था जसे अ‍ॅग्रीगेटर/ प्रक्रियादार/निर्यातदार / मध्यम व मोठ्या रिटेल विक्री संस्था / कृषि तंत्र वा आर्थिक तंत्र संस्था) यांचा समावेश आहे. मॅग्नेट प्रकल्पातील पहिल्या दोन टप्प्यातील शेतकरी उत्पादक कंपनी, सहकारी संस्था व लोकसंचलित साधन केंद्र यांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळालेला होता.

मॅग्नेट प्रकल्पाचा कालावधी 6 वर्षाचा असून तिसर्‍या टप्प्यासाठी नुकतीच जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. तिसर्‍या टप्प्यात नोंदणी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ www.msamb.com या संकेतस्थळावर लिंक देण्यात आलेली आहे. अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारे पात्रता निकष, विहीत नमुन्यातील अर्ज, मुल्यांकन निकष व कागदपत्रांची चेकलिस्ट, या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. अर्जदारांनी विहीत नमुन्यातील अर्ज भरून चेकलिस्टप्रमाणे आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडून मॅग्नेट प्रकल्प अंमलबजावणी कक्ष (पी.आय. यू) तथा महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, श्री छत्रपती शाहू मार्केट यार्ड, विभागीय कार्यालय कोल्हापूर येथे छापील प्रतीत सादर करावेत. अर्ज सादर करण्याचा अंतिम दि. 10 ऑगस्ट 2023 सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत आहे, असे विभागीय प्रकल्प उपसंचालक, मॅग्नेट प्रकल्प पी.आयु.यू.कोल्हापूर डॉ. सुभाष घुले यांनी कळवले आहे.

या फळांचा आहे समावेश

तिसर्‍या टप्प्यात मॅग्नेट प्रकल्पाअंतर्गत केळी, पेरू, डाळिंब, चिक्कू, सिताफळ, स्ट्रॉबेरी, संत्री, मोसंबी, भेंडी, मिरची (हिरवी / लाल) व फुलपिके या अगोदरच्या 11 पिकांसह नवीन चार पिकांचा (आंबा, काजू, लिंबू आणि पडवळ) यांचा समावेश करण्यात आलेला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT