सातारा : महामार्गावरील वेळे ते पाचवड रस्त्यावर चालत्या कारमधील खिडकीतून दोन्ही बाजूने दोन युवक व सनरुफमध्ये एक युवक-युवती उभे राहून फ्रेंडशिप डेचा स्टंट करत होते. महामार्गावर वेगात असलेल्या या कारमधील युवक-युवतींच्या धोकादायक कसरती सुरू होत्या. त्यामुळे लगतच्या वाहनचालकांनाही अपघाताची भीती वाटत होती. या प्रकाराने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, रविवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास ही घटना समोर आली आहे. भुईंज पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुट्टीमुळे पुणे बाजूने व कोल्हापूर बाजूने जाणार्या वाहनांची गर्दी होती. वाहने सुसाट असताना एका कारमध्ये खुलेआम जीवघेणा स्टंट सुरू होता. कारच्या दोन्ही खिडकीतून दोन युवक लटकलेले होते. तसेच कारच्या सनरुफमधून एक युवती व युवक फ्रेंडशिप डेच्या आणाभाका घेत होते. या युगुलांचे फोटो व व्हिडीओ शूट खिडकीतून बाहेर आलेले दोन युवक करत होते. चालत्या भरधाव कारमधील हा प्रकार सुजाण नागरिकांनी टिपला. हा व्हिडीओ समाजमाध्यमांवर रविवारी दिवसभर व्हायरल होत होता. कार दुसर्या जिल्ह्यातील असून संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
पोलिस संबंधितांवर गुन्हा दाखल करणार का?
भरधाव कारमध्ये महामार्गावर जीवघेणा प्रकार पाहून सर्वजण आश्चर्य चकित होत होते. चालत्या कारमध्ये बराचवेळ उभे राहून ही स्टंटबाजी सरू असताना महामर्गावरील पोलिसांना हे कसे काय दिसले नाही? पोलिस संबंधितांना पकडणार का? गुन्हा दाखल करणार का? असे सवाल उपस्थित झाले आहेत.