कास पठारावर यापूर्वी पर्यटकांसाठी आणलेली ही वाहने धूळ खात पडली असताना, आता इलेक्ट्रिक बसचा अट्टाहास केला जात आहे. Pudhari Photo
सातारा

Kas plateau: कासवर लवकरच धावणार चार इलेक्ट्रिक बस

खरेदीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात : वन विभाग व पठार समितीचा निर्णय

पुढारी वृत्तसेवा

बामणोली : जागतिक वारसास्थळ असलेल्या कास पुष्प पठारावरील फुलांचा हंगाम सुरू झाला असून, या ठिकाणी आता राजमार्गावरील कुमुदिनी तलावापर्यंत ये-जा करण्यासाठी पर्यटकांची इलेक्ट्रिक बसमधून सफर होणार आहे. याबाबतचा संकल्प सातारा वन विभाग व कास पठार कार्यकारी समिती यांच्याकडून आखण्यात आला आहे. याकरिता पठारावर चार नवीन इलेक्ट्रिक बस खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू असून, आठ दिवसांत या बस पठारावर धावणार आहेत.

कास पठारावरील फुलांचा हंगाम सुरू झाला असून, पठारावर फुलांचा नजारा पाहायला मिळत आहे. पर्यटकांना सोयी-सुविधा देण्यासाठी सातारा वन विभाग व कास पठार कार्यकारी समिती प्रयत्नशील असून, त्याच धर्तीवर इलेक्ट्रिक बसचा पर्याय समोर आला आहे. सातारा वनपरिक्षेत्र अधिकारी संदीप जोपळे यांच्याद्वारे व उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली ही सर्व प्रक्रिया राबवली जात आहे. पहिल्या टप्प्यात एक ते दोन बस या ठिकाणी येतील, असे सांगण्यात येत आहे.

कास पठार कार्यकारी समितीच्या वतीने कास पुष्प पठारावर सुरू असलेल्या दोन जंगल सफारीच्या गाड्या, एक समितीच्या वापरासाठी असलेली गाडी त्याचप्रमाणे ट्रॅक्टर यांचा मेंटेनन्स कास पठार कार्यकारी समितीला वर्षभर परवडत नसताना आता या इलेक्ट्रिक बस दाखल होणार आहेत. याबाबतची प्रक्रिया सुरू असून, आठ दिवसांत या बस पठारावर येतील, असे सांगण्यात आले आहे.

एकीव समितीचे अध्यक्ष प्रदीप कदम यांनी या संदर्भात सांगितले की, चार इलेक्ट्रिक बस खरेदी करण्याचा विषय घेण्यात आला होता. त्यावर बोलताना आम्ही वनविभागाच्या अधिकार्‍यांना प्रायोगिक तत्त्वावर एकच बस खरेदी करून ती कशी चालत आहे, हे आपण पाहूया व नंतर बाकीच्या बस खरेदी करू, असे सुचवल्याचे ते म्हणाले.

अगोदर खरेदी केलेली वाहने धूळ खात

कास पुष्प पठारावर पर्यटनाच्या माध्यमातून दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी जमा होतो. या निधीमधूनच पर्यटनाच्या नावाखाली या ठिकाणी वाहनांची खरेदी केली जाते. कासचा हंगाम हा एक ते दोन महिन्यांचा असतो; मात्र त्यानंतर ही सर्व वाहने पठारावर धूळ खात उभी असल्याचे पाहावयास मिळते. जंगल सफारी करता दोन गाड्या खरेदी केल्या होत्या; मात्र पर्यावरण प्रेमींच्या विरोधानंतर ही सफारी बंद केल्या. हंगाम एक ते दोन महिन्याचा असेल तर लाखो रुपयांचा चुराडा वन विभाग व कास पठार कार्यकारी समिती कशासाठी करत आहे? असा देखील सवाल उपस्थित होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT