सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा कोथळा बाहेर काढून शिवपराक्रम जगाला दाखवला, तो किल्ले प्रतापगड जागतिक वारसास्थळ म्हणून जगाच्या नकाशावर आला आहे. याच किल्ले प्रतापगडावर ऐतिहासिक संवर्धनाचे काम सुरू असताना चोरवाटेचा शोध लागला आहे. गडावरील पालखी बुरुजाजवळची ऐतिहासिक चोरवाट मातीच्या ढिगाऱ्यातून मोकळी करण्यात आली आहे. संवर्धन काळात शिवकालीन दुर्गशास्त्राचे आणखी वैभव जगासमोर येणार असून या संवर्धनात ऐतिहासिक वास्तुंचा ठेवा उजेडात येणार आहे. छत्रपती शिवरायांच्या जयंतीच्या धामधुमीत हे नवे संशोधन शिवपराक्रमाला आणखी झळाळी देणारे ठरत आहे.
ऐतिहासिक किल्ले प्रतापगडाची उभारणी 1656 मध्ये झाली. ही जबाबदारी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या अष्टप्रधान मंडळातील विश्वासू सहकारी मोरोपंत त्रिंबक पिंगळे यांच्यावर सोपवली होती. पार घाट सुरक्षित करण्यासाठी, तोफा डागण्यासाठी भक्कम तटबंदी असावी व शत्रूवर नजर ठेवणे सोपे व्हावे या हेतूने या किल्ल्याची निर्मिती करण्यात आली. जावलीचे घनदाट अरण्य व दुर्गम प्रदेश यामुळे छत्रपती शिवरायांनी हे ठिकाण निवडले असावे, असे इतिहासकार सांगतात. प्रतापगड किल्ल्याची दोन भागात उभारणी केली असून वरचा भाग बालेकिल्ला तर खालचा तटबंदीचा भाग अशी दोन विभागात त्याची रचना आहे.
समुद्र सपाटीपासून 3543 उंच फूट उंचीवर प्रतापगडाची उभारणी करण्यात आली. पुढे दि. 10 नोव्हेंबर 1659 मध्ये छत्रपती शिवरायांनी आदिलशाही सेनापती अफझलखानाचा कोथळा याच किल्ल्याच्या पायथ्याशी बाहेर काढला. शिवरायांच्या या पराक्रमाचा किल्ले प्रतापगड साक्षीदार ठरला. गेल्या काही वर्षात किल्ले प्रतापगडाच्या संवर्धनाचा मुद्दा पुढे आला. त्यानुसार प्रतापगड किल्ल््याच्या सर्वधन व विकासासाठी राज्य सरकारने जुलै 2024 मध्ये खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली प्रतापगड किल्ला विकास प्राधिकरण स्थापन केले. त्यावेळी 127 कोटी रुपयांच्या निधीची घोषणाही करण्यात आली. त्यानंतर प्रतापगड विकास प्राधिकरणाकडून किल्ल््याच्या दुरुस्तीचे काम शास्त्रोक्त पद्धतीने सुरू करण्यात आले.
सध्या 27 कोटी रुपये उपलब्ध झाले असून त्यामधून किल्ले प्रतापगडच्या संवर्धनाला गती देण्यात आली. किल्ल्यावरील एकेका कामाला सुरूवात झाल्यानंतर आतापर्यंत पालखी बुरुज, झेंडा बुरुज ते पालखी बुरुज दरम्यानची तटबंदी, यशवंत बुरुज आणि रेडका बुरुज यांचे संवर्धन पूर्ण झाले आहे. यादरम्यानच पालखी बुरूजाजवळ संवर्धनाचे काम सुरू असताना तब्बल 7 फुटाची चोर वाट उजेडात आली. याठिकाणी तटबंदी वरवर पाहिल्यानंतर दिसत होती. झाडाझुडुपांनी व मातीच्या ढिगाऱ्यांनी हा परिसर वेढला होता.
मात्र, संवर्धन करताना याच पालखी बुरूजाजवळ खोदकाम सुरू होते. त्यावेळी काही कर्मचाऱ्यांना याठिकाणची माती ढिसूळ लागली. उत्सुकतेपोटी आणखी खोदकाम करण्यात आले. त्यावेळी तटबंदीतून चक्क 7 फुटाची चोरवाट समोर आली. साधारण साडेतीन फूट उंची असलेली ही चोरवाट किल्ल्याच्या आतील बाजूस 12 ते 15 फूट मातीच्या ढिगाऱ्यात झाकली गेली होती. बारकाईने पाहिल्यानंतर तटबंदीच्या बाहेर मात्र त्याठिकाणी कमानीसारखी ठेवण दिसत होती.
ऐनवेळी अचानक शत्रूने किल्ल्याच्या मुख्य दरवाजामार्गे हल्ला केल्यास गनिमी काव्याने चोरवाटेतून बाहेर पडून शत्रूवर पाठीमागून हल्ला करता यावा यासाठी ही चोरवाट असावी, असा इतिहास संशोधकांचा दावा आहे. किल्ल्यावर अशा अनेक चोरवाटा असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचाही शोध आता घेतला जाणार आहे. दरम्यान, संवर्धनाच्या कामाने गती घेतली असून तटबंदीच्या भिंतींमधील दर्जे (सांधे) भरण्याचे काम पूर्ण झाले असून पुढील टप्प्यात ऐतिहासिक पायरी मार्ग आणि तळ्यांचे पुनरुज्जीवन केले जाणार आहे.
पावसाळ्यात होणारे भूस्खलन रोखण्यासाठी विशेष तंत्रज्ञानाचा वापर करून संरक्षणात्मक कामे केली जाणार आहेत. प्रतापगडावरील हे संवर्धन कार्य केवळ दगड-धोंड्यांची डागडुजी नसून येणाऱ्या पिढ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य आणि स्थापत्यशास्त्राची ओळख करून देणारा एक महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. संवर्धनाचे हे काम डिसेंबर 2026 अखेर पूर्ण करण्याचा मानस प्राधिकरण विभागाने तयार केला आहे. त्यापुढे जसा निधी उपलब्ध होईल त्यानुसार पुढील कामे केली जाणार आहेत. यात अनेक चोरवाटा, नाणी, राजमुद्रा, तत्कालीन वस्तू, दस्तावेज, शस्त्रे, दागिने यासह अन्य ऐतिहासिक वास्तू या जतन व संवर्धनावेळी समोर येणार आहेत.