दहिवडी : पुढारी वृत्तसेवा
माणच्या पश्चिमेकडील तेलदर्यासह अनेक गावात बुधवारी पहाटे दोन तास ढग फुटीसद़ृश पाऊस झाला. या पावसाचे पाणी आंधळी नदीपात्रात आल्याने माणगंगा नदीला पूर आला. दहिवडी परिसरात पावसाचा थेंबही न पडता बुधवारी दहिवडी-जुना फलटण रस्ता पाण्याखाली गेला. पाऊस न पडता चार ठिकाणी पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली. गेले काही दिवस हवेत उष्मा निर्माण होत आहे. अधूनमधून काही गावात पावसाच्या सरी पडत आहेत. परतीचा पाऊस मात्र मार्डी व परिसरात अद्यापही न पडल्याने त्या भागात पाण्याची दुरावस्था असून तेथे मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी आहेत. या उलट मलवडीच्या वरील डोंगराळ परिसरात जोरदार पाऊस झाल्याने यापूर्वीच ओढे नाले भरून वाहत आहेत. त्या परिसरातील बंधारेही भरले आहेत. सर्व वाहून जाणारे पाणी नदीतून आंधळी धरणात येत आहे. गेल्या तीन महिन्यांपूर्वी जिहे-कठापूर योजनेचा शुभारंभ झाल्याने कृष्णा नदीचे पाणी प्रथमच आंधळी धरणात आले व त्या पाण्यातून माणगंगा नदी प्रवाही करण्यात आली आहे.
पाऊस न पडताही माणगंगेला प्रथमच पाणी वाहत आहे. असे असतानाच अचानक परतीच्या पावसाने अनेक ओढ्यातून पाणी आंधळी धरणात येत होते. त्यातच बुधवारी पहाटे दोन अडीच तास तेलदर्यासह अनेक डोंगराळ भागात मुसळधार पाऊस झाल्याने सर्व ओढ्यांचे पाणी आंधळी धरण्यातून माणगंगा नदीपात्रात मिसळल्याने नदी दुथडी भरुन वाहू लागली आहे. नदीला अचानक पाणी वाढल्याने आंधळी व बिदाल ते पांगरी रस्त्यावरील पूल, तसेच दहिवडीतील जुना फलटण रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेले. नदीला मोठा पूर आल्याने कित्येक तास या रस्त्यांवरील वाहतूक ठप्प होती. माण तालुक्यातील अनेक भागात चांगला पाऊस झाला असला तरी शेवरी, रानंद, मार्डी या परिसरातील अनेक गावात अत्यल्प पाऊस झाल्याने तेथे अद्यापही पावसाची प्रतीक्षा आहे. परतीच्या पावसाची मार्डी व परिसराला गरज असून या परिसरातील शेतकरी चिंतेत आहेत.