सातारा : सातार्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाला आठ महिन्यांत राज्यभरातील सुमारे पाच लाख शिवप्रेमींनी भेट दिली. या शिवप्रेमींनी ऐतिहासिक वाघनखांसह शिवकालीन शस्त्र व अन्य वस्तूंचा इतिहासही जाणून घेतला आहे.
सातार्यातील मार्केट यार्ड येथे 1966 साली छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाच्या उभारणीचा मुहूर्त झाला व 1970 रोजी या संग्रहालयाचे काम पूर्णत्वास आले. परंतु वस्तू संग्रहालयासाठी ही जागा अपुरी पडू लागल्याने बसस्थानकाशेजारी असलेल्या हजेरी माळावर संग्रहालयाची नूतन इमारत उभी राहिली. याच इमारतीत लंडन येथील व्हिक्टोरिया अॅन्ड अल्बर्ट म्युझियममधील ऐतिहासिक वाघनखे पाहण्यासाठी खुली करण्यात आली आहेत. राज्य शासनाने लंडन येथील म्युझियमशी तीन वर्षांचा करार केला असून, वाघनखे तीन वर्षांसाठी भारतात राहणार आहे. ही वाघनखे भारतात दाखल झाल्यानंतर ती सर्वप्रथम स्वराज्याच्या राजधानीचा मान मिळालेल्या सातार्यात आणण्यात आली.
दि. 19 जुलै रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत आयोजित कार्यक्रमात शस्त्र प्रदर्शनाचे उद्घाटन करुन संग्रहालय शिवप्रेमींसाठी खुले झाले. पुरातत्व विभाग व राज्य शासनाने तयार केलेल्या वेळापत्रकानुसार या ऐतिहासिक वाघनखांचा सातार्यातील मुक्काम दि. 31 जानेवारीला पूर्ण झाला असून दि. 1 फेब्रुवारीला ही वाघनखे नागपूर येथील मध्यवर्ती संग्रहालयाकडे मार्गस्थ केली जाणार आहे. दि. 1 फेब्रुवारी ते 2 ऑक्टोबर 2025 पर्यंत ही वाघनखे नागपूर व त्यानंतर दि. 3 ऑक्टोबर ते 3 मे 2026 पर्यंत ती कोल्हापूर येथील संग्रहालयात पाहण्यासाठी ठेवली जाणार आहेत.
संग्रहालयात वाघनखांसह सातार्याचे तख्त, स्वराज्याच्या कुलमुखत्यार महाराणी येसूबाई यांची नाममुद्रा, भाले, तलवारी, कट्यार, चिलखत, बुंदुका, चांदी व सोन्याच्या मुद्रा आदी वस्तू पाहण्यासाठी मांडण्यात आल्या आहेत. शस्त्र प्रदर्शन सुरु झाल्यापासून शालेय विद्यार्थ्यांसह राज्यभरातील नागरिक या संग्रहालयाला भेटी देत आहेत. गेल्या आठ महिन्यांत सुमारे पाच लाख नागरिकांनी संग्रहालयास भेट दिली असूनर येथील वाघनखे व शस्त्रास्त्रांचा इतिहास जाणून घेतला.
आता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या डाव्या हाताचा पंजा संग्रहालयात आहे. हातावर चंदनाचा लेप लावून तो ठसा कागदावर उमटवण्यात आला आहे. इतिहास तज्ज्ञ. ग. ह. खरे यांनी हा ठसा त्यावरील माहितीचे वाचन केले होते. म्हसवड येथील राजमाने घराण्याकडून हा ठसा 50 वर्षांपूर्वी संग्रहालयाकडे सुपुर्द करण्यात आला. या शिवाय सातार्याचे संस्थापक शाहू महाराज थोरले यांचा बिचवा व शिवकालीन एकधारी वाघनख अशा ऐतिहासिक वस्तुंचे येथे संवर्धन करण्यात आले आहे.