सातारा : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत केंद्र शासनाने महाराष्ट्रासाठी मंजूर केलेल्या 30 लाख घरांपैकी 5 लाख घरे पूर्ण झाली असून, या घरांचे लोकार्पण तसेच योजनेसाठी 10 हजार कोटी रुपयांच्या निधी वितरणाचा कार्यक्रम शुक्रवारी येथील सैनिक स्कूल मैदानावर आयोजित केला असून, कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय ग्रामीण विकासमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होईल. कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी कार्यक्रमस्थळाची पाहणी करून अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
ना. गोरे यांनी कार्यक्रम स्थळाची पाहणी केली. यावेळी कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेऊन विविध यंत्रणांशी समन्वय साधला. लाभार्थी, नागरिक आणि मान्यवरांच्या सोयी-सुविधांच्या दृष्टीने सुरक्षा व्यवस्था, वाहतूक नियोजन तसेच इतर आवश्यक बाबींबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. उन्हाची तीव्रता लक्षात घेता कार्यक्रमस्थळी पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था, सावलीसाठी मंडप, वैद्यकीय सुविधा तसेच नागरिकांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याबाबत ना. जयकुमार गोरे यांनी विशेष सूचना दिल्या.
यावेळी सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे, उपाध्यक्ष राजू भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, समाज कल्याण समितीचे सभापती ऋषीकेश धायगुडे, भाजपा सातारा लोकसभा संयोजक सुनील काटकर, भाजपा सातारा जिल्हा निवडणूक प्रमुख धैर्यशील कदम, जि.प. सदस्य धनाजी पाटील, भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा सुरभी भोसले, सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी उपस्थित होते.
खर्चात काटकसर करून कार्यक्रम करणार : गोरे
सैनिक स्कूल मैदानावर कार्यक्रम स्थळाची पाहणी करून पत्रकारांशी बोलताना ना. गोरे म्हणाले, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत हा राज्याचा कार्यक्रम साताऱ्यात होत आहे. या लाभार्थ्यांना कार्यक्रमस्थळी आणण्यासाठी एसटी महामंडळाच्या बसेसची व्यवस्था केली आहे. यासाठी जो काही खर्च होईल, तो शेवटी शासनाच्याच तिजोरीत जाईल, अशी व्यवस्था करत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार कमीत कमी खर्चामध्ये काटकसर करून हा कार्यक्रम यशस्वी व्हावा, अशा पद्धतीचे नियोजन करत आहोत.