Asgaon Tragic News | सकाळी येतोय म्हणाले, पण ते परत आलेच नाहीत..! 
सातारा

Asgaon Tragic News | सकाळी येतोय म्हणाले, पण ते परत आलेच नाहीत..!

पाच जिवलग मित्रांच्या मृत्यूने आसगाव सुन्न; गावातील कोपरान्कोपरा अश्रूंनी न्हाला

पुढारी वृत्तसेवा

राजेंद्र साबळे

शिवथर : आसगावच्या कोपर्‍याकोपर्‍यामध्ये रविवारी एकच प्रश्न सतावत होता ‘फोन का लागत नाहीये रे?’ कुणाच्या आईच्या डोळ्यांत चिंता होती, कुणाचे वडील रात्रभर मोबाईल हातात घेऊन बसले होते, तर मित्र मंडळी एकमेकांना फोन करून आपल्या जिवलग मित्रांना शोधत होते; पण नियतीने आधीच काळाकुट्ट डाव टाकला होता. कोकण ट्रिपचा आनंद साजरा करून गावाकडे परतणार्‍या आसगावच्या पाच तरुण मित्रांना मृत्यूने दाभिळ टोकाच्या खोल दरीत कायमचे कवटाळले होते. ‘आम्ही सकाळी येतोय...’ हा सांगावा आला; पण ते आलेच नाहीत. कायमचे निघून गेले, सगळ्यांनाच चटका लावून.

आसगाव (ता. सातारा) हे छोटे गाव. सोमवारी जिल्ह्यासह राज्यभर चर्चेत आले ते हृदयाला चटका लावणार्‍या घटनेने. आसगावच्या चौघांना व आजोळी आलेल्या एकाला अशा पाचजणांना काळाने आपल्या उदरात सामावून घेतले. या घटनेने आसगाव सुन्न झाले असून, गावातील कोपरान्कोपरा अश्रूंनी न्हाला आहे. आदित्य साळुंखे (वय 21), महेश पवार (22), रितेश लोखंडे (21), सुहास लोखंडे (19) व अंश चव्हाण (19) हे पाचजण भीषण अपघातात जागीच ठार झाले. अंश हा रत्नागिरी जिल्ह्यातील असून, आदित्य साळुंखे या मित्राच्या कुटुंबातील लग्नकार्य असल्यामुळे तो आसगावला आला होता. अंशचे आसगाव हे आजोळही आहे. या पाचही जणांचा मृत्यू काळीज पिळवटून गेला.

कोकणात फिरायला गेलेल्या या मित्रांनी ‘रविवारी सकाळी येतो,’ असे आपापल्या घरी फोन करून सांगितले होते. त्यामुळे ते प्रत्येक घर आपल्या लेकराच्या वाटेकडे डोळे लावून बसले होेते. सकाळ उजाडली, आता येतील, मग येतील, असे वाटले; पण ते काही येईनात. दुपार झाली, काळजीने सगळेच व्याकूळ झाले, फोन करू लागले; पण फोन काही लागेनात. त्यामुळे मनात नको नको ते येऊ लागले. चिंतेने सारेच व्याकूळ झाले. काय करावे कळत नव्हते. दिवसभर सातजणांचे फोन लागत नव्हते. मात्र, रितेशचा फोन सुरू होता. तो फोन वाजत होता; पण उचलला जात नव्हता. अशा भेदरलेल्या वातावरणातच रात्री बारा वाजता त्यांच्या अपघाताची माहिती समजली अन् अख्खे आसगाव हेलावून गेले. गावकर्‍यांनी आसगावमधून गाड्यांचा ताफा घेऊन घटनास्थळ गाठले. प्रत्येकजण मनात एकच प्रार्थना करत होता, ‘देवा, ही बातमी खोटी ठरू दे;’ पण दरीत पडलेल्या स्कॉर्पिओने सर्व आशा संपवल्या होत्या. हा मित्र परिवार परत गावी येऊच शकला नाही. या दुर्घटनेने संपूर्ण आसगाव अक्षरशः सुन्न झाले. ज्या घरांत कालपर्यंत हसण्याचे आवाज होते, तेथे आता आक्रोश घुमत होता. गावातील प्रत्येक रस्ता, चौक, कट्टा आणि मित्रांचा ग्रुप एका क्षणात गलबलून गेला. कालपर्यंत एकत्र फिरणारे पाच मित्र आता गावाच्या आठवणीत कायमचे एकत्र झाले आहेत! पण केवळ स्मृती म्हणूनच.

चौघेजण होते एकुलते एक

या पाच मित्रांपैकी चौघेजण आई-वडिलांना एकुलते होते. त्यामुळे त्या कुटुंबांचा आधारच हरपला आहे. ‘मुलगा सकाळपर्यंत येतो’ या आशेवर डोळे लावून बसलेल्या आई-वडील व कुटुंबीयांच्या पदरी अखेर अश्रूच पडले.

अभिनय करणारा महेश आला होता सुट्टीवर

महेश पवार अभिनय क्षेत्रात स्वतःचे स्थान निर्माण करण्यासाठी झगडत होता. ‘अप्पी आमची कलेक्टर’ मालिकेत काम करत असलेला हा तरुण काही दिवसांच्या सुट्टीसाठी गावात आला होता. मित्रांसोबत आनंदाचे काही क्षण जगण्यासाठी तो ट्रिपला गेला आणि परतलाच नाही.

आदित्यचे लग्न घर बुडाले शोकसागरात

आदित्य साळुंखे याच्या बहिणीचे अवघ्या आठ दिवसांपूर्वी लग्न झाले होते. बहिणीची हळदही निघाली नव्हती. घरात लग्नाचा उत्साह असतानाच मृत्यूची बातमी धडकली आणि आनंदाचे घर क्षणात शोकसागरात बुडाले.

पोलिस होण्याचे रितेशचे स्वप्न अधुरेच...

रितेश लोखंडे पोलिस भरतीसाठी दिवस-रात्र मेहनत घेत होता. गावात धावणारा, व्यायाम करणारा रितेश आता कायमचा शांत झाला. त्याची भरती होण्याची मोठी जिद्द होती. मात्र, त्याचे हे स्वप्न अपुरेच राहिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT