सातारा : तडजोड हुकूमनामा मुद्रांकित करून देण्यासाठी सहजिल्हा निबंधक वर्ग 1 व मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयातील लिपीक पल्लवी रामदास गायकवाड (कारंडे) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 5 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. सातार्यात बुधवारी दुपारी ही कारवाई झाली. महिला कर्मचारी लाच घेताना सापडल्याने खळबळ उडाली.
अधिक माहिती अशी, यातील तक्रारदारांच्या वडिलोपार्जित मिळकतीमध्ये बहीण-भावामध्ये वाद होता. यावरून दिवाणी न्यायालय, सातारा येथे दावा सुरू होता. या दाव्यामध्ये बहीण-भावाची तडजोड झाली. तो तडजोडनामा घेऊन सैदापूर ग्रामपंचायत ता. सातारा येथे तक्रारदार गेले. ग्रामपंचायतीमध्ये तो हुकुमनामा मुद्रांकित करुन आणण्यास सांगिल्यामुळे तक्रारदार सह जिल्हा निबंधक वर्ग 1 व मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालय (सातारा तहसील परिसरातील) येथे गेले. संबंधित कामासाठी तेथील लिपीक सौ. पल्लवी गायकवाड यांनी 5 हजार रुपयांची मागणी केली.
लाचेची मागणी झाल्याने तक्रारदारांनी सातारा लाचलुचपत कार्यालयात तक्रार दिली. लाचेची रक्कम बुधवारी स्वीकारणार असल्याने एसीबी विभागाने सापळा लावला. यावेळी सौ.पल्लवी गायकवाड यांना लाच स्वीकारतांना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. पोलिस उपअधीक्षक राजेश वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुनील पाटील यांच्यासह एसीबी विभागातील पोलिसांनी कारवाईमध्ये सहभाग घेतला. दरम्यान, सातारा शहरासह जिल्ह्यात कुठेही लाचेची मागणी झाल्यास 1064 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.